वाॅशिंग्टन : अमेरिकेत तीन बँका बुडाल्यानंतर जगभरातील बँकिंग क्षेत्रावर चिंतेचे सावट पसरले आहे. त्यातच गुंतवणूकदारांना धडकी भरविणारा एक अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यानुसार, अमेरिकेतील तब्बल १८६ बँका संकटात आहेत. फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढविण्याचा सपाटा लावल्यामुळे बँकांच्या संपत्तीच्या झालेल्या नुकसानीचा आढावा या अहवालात घेण्यात आला आहे.
साेशल सायन्स रिसर्च नेटवर्कवर ‘२०२३मध्ये आर्थिक कठाेरता आणि अमेरिकेतील बँकांची नाजूक स्थिती’ या विषयावर अहवाल सादर करण्यात आला आहे. विम्याचे संरक्षण नसलेल्या २.५ लाख डाॅलर्सपेक्षा अधिक ठेवींचादेखील तपास करण्यात आला. या ठेवीदारांपैकी निम्म्याहून अधिक ठेवीदारांनी या १८६ बँकांमधून पैसे काढल्यास विम्याचे संरक्षण घेणाऱ्या ठेवीदारांचे नुकसान हाेण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत सर्व ठेवीदारांना पूर्ण पैसे देण्यासाठी पुरेशी संपत्ती राहणार नाही. परिणामी एफडीआयसीला मध्यस्थी करावी लागू शकते. (वृत्तसंस्था)
विमासंरक्षित रक्कम धाेक्यात
विमा न घेणाऱ्या ठेवीदारांनी अर्धे पैसे काढल्यास सुमारे ३०० अब्ज डाॅलर्स एवढी विमासंरक्षित रक्कम धाेक्यात येईल. अशा लाेकांनी झपाट्याने पैसे काढल्यास अनेक बँका अडचणीत येतील.
संकट कशामुळे?
अर्थतज्ज्ञांनी अहवालातून बँकांवरील संकटामागील कारणांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. व्याजदर वाढल्यामुळे बँकांच्या एकूण संपत्तीचे मूल्य कमी झाले. परिणामी ग्राहकांनी विमासंरक्षण नसलेल्या ठेवी झपाट्याने काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे बँका संकटात आल्या. अहवालात नमूद केलेल्या १८६ बँकांना सरकारी हस्तक्षेपाची गरज भासू शकते, असे अहवालात म्हटले आहे.
‘क्रेडिट सुईस’ला ‘यूबीएस’ घेणार विकत
दिवाळखाेरीत निघालेल्या स्वित्झर्लंडच्या क्रेडिट सुईसच्या ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे. स्वित्झर्लंडची ‘यूबीएस’ ही बॅंक क्रेडिट सुईसचे अधिग्रहण करणार आहे.
सुमारे १ अब्ज डाॅलर्स एवढ्या रकमेत हा व्यवहार हाेणार आहे. त्यासाठी स्वित्झर्लंडचे सरकार कायद्यात बदल करून समभागधारांचे मतदान वगळणार आहे.
सिलिकाॅन व्हॅली बॅंकेची मूळ कंपनी एसव्हीबी फायनान्शियल समूहाने दिवाळखाेरीसाठी रितसर अर्ज दाखल केला आहे.