अदानी समूहाची कंपनी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ) ने १,५०० कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड केली आहे. कंपनी येत्या मार्चमध्ये आणखी एक हजार कोटी रुपये फेडणार आहे. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहावर मोठं संकट आलंय. समूह कंपन्यांच्या शेअर्सचे भाव सातत्यानं घसरत आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणुकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी समूहाकडून सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत.
अदानी पोर्टनं १,५०० कोटी रुपयांचे कर्ज परत केलं आहे. त्यात, सुमारे १ हजार कोटी रुपये SBI म्युच्युअल फंडाचे आहेत. कंपनीने सोमवारी कमर्शिअल पेपर्स मॅच्युअर झाल्यानंतर एसबीआय म्युच्युअल फंडाची ही रक्कम फेडली. दरम्यान, अदानी पोर्टवर त्यांचं आता कोणतंही कर्ज नसल्याचं एसबीआय म्युच्युअल फंडाच्या वतीने सांगण्यात आलंय.
बिर्ला सन लाइफचं कर्ज फेडलंअदानी पोर्ट्स अँड स्पेशन इकॉनॉमिक झोनंनं माहिती दिली की त्यांनी आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाच्या ५०० कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड केली आहे. या कर्जाची परतफेड देखील कंपनीने एसबीआय सारख्या व्यावसायिक कागदपत्रांच्या मुदतपूर्तीवर केली आहे. कंपनीच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, कर्जाची परतफेड रोख शिल्लक आणि व्यावसायिक कामकाजातून मिळालेल्या उत्पन्नातून करण्यात आली आहे.
८ हजार कोटींचं कर्ज फेडलंअदानी समूह गुंतवणूकदारांचा विश्वास परत मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहे. एसबीआय म्युच्युअल फंड आणि बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड यांना पैसे परत करण्यापूर्वी, समूहाने क्रेडिट सुईस, जेपी मॉर्गन, जेएम फायनान्स सारख्या इतर कंपन्यांचे सुमारे ८ हजार कोटी रुपयांचे कर्ज मुदतीपूर्वीच भरलं. सप्टेंबर २०२२ मध्ये अदानी समूहावरील एकूण कर्ज २.२६ लाख कोटी रुपये होते.