Airtel Results : देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयच्या नफ्याची चर्चा अजून संपलेली नव्हती की टेलिकॉम क्षेत्रातील एका बड्या कंपनीच्या नफ्याची चर्चा सुरू झाली आहे. आम्ही येथे रिलायन्स जिओबद्दल बोलत नाही. आम्ही तुम्हाला भारती एअरटेलबद्दल (Bharati Airtel) बोलत आहोत. ज्यानx आपल्या तिमाही नफ्यानं संपूर्ण देशाला टेलिकॉम इंडस्ट्रीचा खरा 'बाहुबली' कोण हे सांगितलं आहे. हा नफा पाहून संपूर्ण टेलिकॉम क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
यामागेही एक कारण आहे. युजर्सच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या नफ्यात केवळ २६ टक्के वाढ झाली आहे. तर भारती एअरटेलच्या नफ्यात पाचपटीनं म्हणजे ४६१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
एअरटेलचा विक्रमी नफा
चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत भारती एअरटेलचा निव्वळ नफा पाच पटीनं वाढून १६,१३४.६ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला २,८७६.४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कामकाजातून मिळणारं उत्पन्न ४५,१२९.३ कोटी रुपये होते, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत ३७,८९९.५ कोटी रुपये होतं, असं देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या दूरसंचार कंपनी एअरटेलनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटलंय.
४१४ मिलियन ग्राहक
एअरटेलनं चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ०.६ मिलियन पोस्टपेड ग्राहक जोडले असून, ग्राहकांची संख्या २५.३ मिलियन झाली आहे. स्मार्टफोन सेगमेंटमध्ये सातत्यानं सुधारणा झाली असून त्यांचा मार्केट शेअर वाढून २५.२ मिलियन झाला आहे, जो वार्षिक आधारावर १०.३ टक्क्यांनी वाढलाय.
रिलायन्स जिओचा नफा
रिलायन्स जिओ इन्फोकॉमचा निकाल १६ जानेवारी रोजी आला. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा नफा २६ टक्क्यांनी वाढून ६,८६१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा ५,४४७ कोटी रुपये होता. डिसेंबर तिमाहीत कंपनीचं उत्पन्न ३३,०७४ कोटी रुपये होतं, जे मागील वर्षीच्या २७,६९७ कोटी रुपयांच्या तुलनेत १९.४ टक्क्यांनी अधिक आहे. कंपनीनं एआरपीयूमध्ये वार्षिक १२% वाढ नोंदवली आणि २०३.३ रुपयांवर पोहोचला. २४ डिसेंबरपर्यंत कंपनीची एकूण ग्राहक संख्या ४८२ मिलियन होती. ज्यात २.४ टक्के वाढ झाली आहे.