Startup in India : भारत आता जगातील सर्वात मोठा 'स्टार्टअप हब' बनला आहे. देशातील स्टार्टअप्सच्या यशाचा दर जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा चांगला आहे. याच कारणामुळे देशात स्टार्टअप्समध्ये सातत्याने वाढ होत आहे. याचा पुरावा म्हणजे ७ वर्षांत देशातील स्टार्टअपच्या संख्येत १८६ पटीनं वाढ झाली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी संसदेत याची आकडेवारीच सादर केली आहे. उर्वरित जगाच्या तुलनेत स्टार्टअपचा यशाचा दर भारतात सर्वाधिक आहे, असं गोयल म्हणाले.
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले की, भारतातील स्टार्टअपच्या यशाचा दर जगातील इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान गोयल यांनी ही माहिती दिली. नोव्हेंबरच्या अखेरीस देशात ८४,०१२ मान्यताप्राप्त स्टार्टअप होते. खरंतर स्टार्टअपमध्ये अपयशाची शक्यता सर्वाधिक असते. तरीही भारतातील स्टार्टअप्सनं चांगली कामगिरी केली आहे.
१८६ टक्क्यांनी वाढ
भारतातील स्टार्टअप्सच्या यशाचा दर उर्वरित जगाच्या तुलनेत सर्वाधिक आहे, असं गोयल यांनी सांगितलं. देशातील मान्यताप्राप्त स्टार्टअपची संख्या २०१६ मध्ये ४५२ इतकी होती. ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत हाच आखडा ८४,०१२ पर्यंत पोहोचला आहे. केंद्र सरकारने स्टार्टअप इकोसिस्टमला चालना देण्यासाठी १६ जानेवारी २०१६ रोजी स्टार्टअप इंडिया उपक्रम सुरू केला.
योजनेला ४ वर्षांसाठी दिली गेली मंजुरी
फंड ऑफ फंड फॉर स्टार्टअप्स (FFS), स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीम (SISFS), आणि क्रेडिट गॅरंटी स्कीम फॉर स्टार्टअप्स (CGSS) स्टार्टअप्सना त्यांच्या बिझनेस सायकलमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर सहाय्य करतात. स्टार्टअप इंडिया सीड फंड योजना २०२१-२२ पासून चार वर्षांसाठी मंजूर करण्यात आली आहे आणि ती ९४५ कोटी रुपयांच्या निधीसह लागू केली जात आहे. स्टार्टअप्सना संकल्पनेचा पुरावा, प्रोटोटाइप डेव्हलपमेंट, उत्पादन चाचण्या, मार्केट एंट्री आणि व्यावसायीकरणासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे.
कॅपिटल वेन्चर डील्समध्ये वाढ
लंडनस्थित ग्लोबल डेटा संस्थेच्या माहितीनुसार देशातील स्टार्टअप इकोसिस्टममध्ये जानेवारी-ऑक्टोबरच्या काळात कॅपिटल वेन्चर डिल्सच्या संख्येत यावर्षात ७.५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. पण एका रिपोर्टनुसार याच कालावधीसाठी डील्सच्या एकूण व्हॅल्यूमध्ये २९.८ टक्क्यांची घट झाली आहे.