भारताची मेटल आणि मायनिंग व्यवसायातील दिग्गज कंपनी वेदांतासोबत सेमीकंडक्टरची निर्मिती करण्याच्या योजनेत मिठाचा खडा पडलाय. त्यानंतर तैवानची कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी फॉक्सकॉननं दुसरा दिग्गज शोधण्यास सुरुवात केली आहे. फॉक्सकॉन आता अन्य भारतीय कंपनीसोबत सेमीकंडक्टरचं उत्पादन घेण्याच्या विचारात आहे. वेदांता फॉक्सकॉनच्या जॉईंट व्हेन्चरची सेमीकंडक्टरच्या उत्पादनाची योजना पुढे जाऊ शकली नाही. परंतु फॉक्सकॉन आपल्या योजनेतून मागे हटण्याच्या विचारात नाही.
सुमारे वर्षभरापूर्वी फॉक्सकॉननं अब्जाधीश उद्योगपती अनिल अग्रवाल यांच्या वेदांता समूहासोबत गुजरातमधील धोलेरा येथे सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन युनिट स्थापन करण्याची योजना आखली होती. दोन भागीदारांमध्ये उद्भवलेल्या मतभेदांमुळे, सेमीकंडक्टर प्लांटची ही योजना पुढे जाऊ शकली नाही. इकॉनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलंय. या प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीने सांगितलं की, फॉक्सकॉन आणि वेदांत यांच्यात अनेक मतभेद समोर आले आहेत. केंद्र सरकार वेदांता समुहाच्या आर्थिक स्थिरतेच्या बाबतीत चिंतेत आहे आणि फॉक्सकॉननं यामुळेच जॉईंट व्हेन्चर पुढे न नेण्याच्या निर्णय घेतलाय.
वेदांता रिसोर्सेस लिमिटेडनं नुकतीच ४५ कोटी डॉलर्सची रक्कम जमवली आहे. तसंच कंपनी कर्ज फेडण्यावरही काम करत आहे. बाजारातील जाणकारांनीही वेदांता समुहावरील कर्जावर चिंता व्यक्त केलीये. योसबतच त्यांनी समुहासमोरील आर्थिक संकट अधिक वाढण्याचेही संकेत दिलेत. याशिवाय गेल्या काही काळापासून वेदांताला कर्ज घेण्यातही समस्यांचा सामना करावा लागत आहे. एक कमोडिटी ट्रेडिंग कंपनीकडून वेदांता रिसोर्सेसनं २० कोटी डॉलर्सचं कर्ज घेतलंय. भारताच्या दिग्गज व्यावसायिक घराण्यासोबत फॉक्सकॉननं सेमीकंडक्टर प्लांट उभारण्याच्या योजनेवर सुरुवातीच्या टप्प्यातील चर्चा केलीये.