लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : २०० रुपयांच्या नव्या नोटा वर्ष २०१७ संपण्याच्या आत चलनात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे चलनातील कमी मूल्याच्या नोटांची जागा भरून निघण्यास मदत होणार आहे. चलनाची स्थिती नोटाबंदीपूर्वीच्या स्तराच्या सद्या ८४ टक्के आहे, असे एसबीआयच्या अहवालात म्हटले आहे. या अहवालात म्हटले आहे की, २५ नोव्हेंबर २०१६ला संपलेल्या पंधरवाड्यात बँकांकडे असलेल्या रोख रकमेत ५.४ टक्के घट झाली आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये बँकांकडील ही रक्कम २३.१९ टक्के होती. व्यवहारातील चलनापैकी बँकांकडे असणारे चलन साधारणत: ३.८ टक्के असते, ते आता ५.४ टक्के आहे. याचा अर्थ असा निघतो की, अतिरिक्त १.६ टक्के म्हणजे २५ हजार कोटींची अतिरिक्त रक्कम एटीएममध्ये असू शकते. नव्याने दाखल होणारी २०० रुपयांची नोट यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. किमान मूल्याच्या नोटांची जी कमतरता सद्या दिसून येत आहे, ती २०० रुपयांच्या नोटांमुळे भरून येऊ शकते. या अहवालात असेही म्हटले आहे की, रिझर्व्ह बँकेने २०० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. याबाबतचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत बँकांकडे या वर्षी नगदी रक्कम अधिक आहे. कारण नोटाबंदीनंतर बँकातून रक्कम काढण्यास मर्यादा आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर, ५०० रुपयांच्या जुन्या नोटा बंद झाल्या. नव्या २००० रुपयांच्या नोटा चलनात आल्या असल्या, तरी कमी मूल्यांच्या नोटांची जागा भरून काढण्याची आवश्यकता आहे. हा दबाव कमी करण्यासाठीच रिझर्व्ह बँक २०० रुपयांची नोट चलनात आणत आहे.नोटाबंदी आणि चलन तुटवडा नोटाबंदीनंतर देशातील अनेक भागांत १०,२०, ५० आणि १०० रुपयांच्या नोटांची टंचाई निर्माण झाली होती. विशेष म्हणजे, सर्वसामान्य नागरिकांना दररोजच्या व्यवहारांसाठी याच नोटांची आवश्यकता असते. सद्या एटीएममधून १०० रुपयांच्या नोटा मिळत असल्या, तरी त्या तुलनेने फारच कमी मिळतात.म्हणजेच एटीएममधून ५०० आणि २००० रुपयांच्या नोटाच अधिक प्रमाणात मिळतात. परिणामी, कमी मूल्यांच्या नोटांची कमतरता अनेक भागांत जाणवते. २०० रुपयांची नोट आल्यानंतर, ही कसर भरून निघणार आहे.
वर्षअखेरीस चलनात येणार २०० रुपयांची नोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:38 AM