मुंबई : रिझर्व्ह बँक शुक्रवारी २०० रुपयांच्या नोटेचे विमोचन करणार आहे. छोट्या रकमेच्या नोटांची उपलब्धता वाढावी यासाठी तेजस्वी पिवळ्या रंगातील ही नोट चलनात आणण्यात येत आहे. रिझर्व्ह बँकेला नव्या नोटा चलनात आणण्याची परवानगी देण्यात आल्याची घोषणा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केल्यानंतर एक दिवसातच ही नोट आणली जात आहे. महात्मा गांधी मालेतील या नोटेवर गव्हर्नर ऊर्जित पटेल यांची स्वाक्षरी आहे, असे रिझर्व्ह बँकेच्या निवेदनात म्हटले आहे.
अशी असेल २०० रुपयांची नवी नोट
समोरील बाजू : नोट प्रकाशात धरल्यास पारदर्शक होऊन २०० हा आकडा दिसेल. देवनागरी लिपीत २०० आकड्याची प्रतिमा नोटेवर असेल. नोटेवर मध्यभागी महात्मा गांधी यांची प्रतिमा असेल. आरबीआय, भारत, इंडिया आणि २०० ही अक्षरे सूक्ष्म आकारात छापलेली असतील. सुरक्षा धाग्यात भारत आणि आरबीआय लिहिलेले असेल. नोट हलविल्यास धागा हिरवा आणि निळा या रंगांत परिवर्तित होईल. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेच्या उजव्या बाजूस हमी आणि वचनासह गव्हर्नरांची स्वाक्षरी असेल. नोटेच्या खालच्या बाजूस उजवीकडे रंग बदलणारे रुपयाचे चिन्ह आणि २०० हा आकडा असेल. उजव्या बाजूस अशोक स्तंभाचे चिन्ह असेल. महात्मा गांधी यांचे चित्र आणि इलेक्ट्रोटाइप (२००) जलचिन्ह (वॉटरमार्क) असेल. नोटेच्या वर डाव्या बाजूला तसेच खाली उजव्या बाजूला मोठा होत जाणारा नोटेचा क्रमांक असेल. अंधांना नोट ओळखता यावी यासाठी महात्मा गांधी यांची प्रतिमा, अशोक स्तंभ, एच हे इंग्रजी अक्षर, चार कोनीय रेषा आणि दोन वर्तुळे उंचवट्यात छापलेली असतील. नोटेला स्पर्श केल्यास ही चिन्हे हाताला जाणवतील.
मागील बाजू : डाव्या बाजूला वर्ष असेल. स्वच्छ भारत मोहिमेचे बोधचिन्ह आणि घोषवाक्य, सांचीच्या स्तुपाची प्रतिमा, विविध भाषांची सूची, देवनागरी लिपीत २०० हा आकडा असेल. यापूर्वी समाजमाध्यमांवर वेगवेगवळ्या रंगाच्या दोनशेच्या नोटांचे फोटो व्हायरल झाले होते. काहींचा रंग हिरवा तर काहींचा निळा होता. मात्र, रिझर्व्ह बँकेने वेगळ्याच रंगाची नोट येणार असल्याचे वेबसाइटवर जाहीर केले.
२०० रुपयांची नोट आज चलनात येणार, सुट्या नोटांची चणचण कमी होणार
रिझर्व्ह बँक शुक्रवारी २०० रुपयांच्या नोटेचे विमोचन करणार आहे. छोट्या रकमेच्या नोटांची उपलब्धता वाढावी यासाठी तेजस्वी पिवळ्या रंगातील ही नोट चलनात आणण्यात येत आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 04:04 AM2017-08-25T04:04:58+5:302017-08-25T04:05:07+5:30