Join us  

नोटबंदी : मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या उलाढालीत १००० टक्के वाढ

By admin | Published: November 15, 2016 1:56 PM

नोटबंदीच्या निर्णयामुळे रोख रकेमची चणचण भासू लागल्याने अनेकांनी दैनंदिन व्यवहारांसाठी मोबाईल वॉलेट कंपन्यांचा मार्ग निवडला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - काळा पैशाविरोधातील मोहिम तीव्र करत ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केल्यावर ८ दिवस उलटल्यानंतरही अद्याप देशभरात संभ्रमाचे वातावरण आहे. रोख रक्कम उपलब्ध नसल्याने अनेक नागरिक अजूनही बँका व एटीएम बाहेर रांगा लावून तासनतास उभे आहेत, मात्र पुरेशा नोटा नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याचाच फायदा घेत जास्तीत जास्त ग्राहकांना डिजिटल पेमेंटच्या पर्यायाकडे आकर्षित करण्यासाठी पेटीएम, मोबीक्विक यासारख्या अनेक मोबाईल वॉलेट कंपन्यांनी विविध ऑफर्स आणल्या आहेत. त्यामुळे या मोबाईल कंपन्यांच्या व्यवहारांच्या संख्येमध्ये ७०० टक्के वाढ झाली असून उलाढालीमध्येही १००० टक्क्यांची वाढ झाली आहे. 
' कोणत्याही बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी शुल्क आकारण्यात येणार नाही, अशी ऑफर २००९ स्थापन झालेल्या ' मोबीक्विक' या कंपनीने आणली आहे. यामुळे जास्तीत किरकोळ विक्रेते, दुकानदार तसेच ग्राहक हे मोबाईल वॉलेटचा वापर वाढवतील अशी आशा आहे. त्यामुळे रोख रकमेचा वापर करण्यात येणा-या अडचणींवर मात करत येईल, असा विश्वास मोबीक्विकने व्यक्त केला आहे. 
(नोटबंदीचा चोरांनाही फटका, आता 10 व 100 रुपयांच्या नोटांवरच डल्ला)
(VIDEO : रांगेत उभे रहात पंतप्रधानांच्या आईंचा नोटबंदीला पाठिंबा)
  •  
 
'भारतातून काळा पैसा व भ्रष्टाचार कायमचा हद्दपार करण्यासाठी सरकारने घेतलेल्या (नोटा चलनातून बाद करण्याच्या) निर्णयाला आमचा पाठिंबा आहे. मात्र या निर्णयामुळे देशातील जनतेला रोख रकमेच्या घेवाण-देवाणीत खूप अडचणींचा सामना  करावा लागत आहे. त्यांना मदत करण्यासाठीच आम्ही बँक ट्रान्स्फर व्यवहार मोफत ठेवले आहेत' असे मोबीक्विकचे सहसंस्थापक बिपीन प्रीत सिंग यांनी सांगितले. यापूर्वी मोबाईल वॉलेटमधून बँकेत पैसे ट्रान्स्फर करताना ज्यांनी केवायसी (नो युवर कस्टमर) ची पूर्तता केली असेल अशांसाठी १ टक्का तर नॉन- केवायसी युझर्ससाठी ४ टक्के फी आकारण्यात येत असे. ५०० व १००० च्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर मोबीक्विकच्या व्यवहारांमध्ये १८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 
क्रेडिट वा डेबिट कार्डचा वापर करून ग्राहक त्यांच्या मोबाईल वॉलेटमध्ये पैसे भरू शकतात. 8 नोव्हेंबरपासून डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पेमेंट करण्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचेही निदर्शनास आले आहे. 
मोबाईल वॉलेट कंपन्यांमध्ये आघाडीचे नाव असलेल्या ' पेटीएम'ने आत्तापर्यंतचा उच्चांक गाठला असून, आठवड्याभराच्या कालावधीत २४ हजार कोटी रुपयांचे एकूण ५० लाख व्यवहार झाले आहेत. 
गेल्या दोन दिवसांत पेटीएमच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांची संख्या ७०० टक्क्यांनी वाढली असून प्रत्यक्ष उलाढाल १००० टक्क्यांनी वाढल्याचे कंपनीतर्फे नमूद करण्यात आले आहे. 
'या कालावधीत अॅप डाऊनलोड्सची संख्या ३०० टक्क्यांनी वाढली आहे. तसेच प्रत्येक ग्राहकाचे आठवड्याला सरासरी तीन व्यवहार होत, जे वाढून आता १८ वर पोहोचल्याचे' कंपनीने म्हटले आहे.
असोचेमच्या निष्कर्षानुसार सध्या मोबाईल पेमेंट प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वर्षाला 3 अब्ज व्यवहार होतात, जे पुढील सहा वर्षांमध्ये 90 टक्क्यांच्या चक्रवाढ गतीने वाढत 153 अब्ज व्यवहारांपर्यंत पोचतील.