Join us

बनावट सौंदर्य प्रसाधने विकणाऱ्यांना नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 4:02 AM

बनावट वस्तूंची विशेषत: सौंदर्य प्रसाधनांची विक्री केल्याप्रकरणी भारतीय औषध नियंत्रक मंडळाने काही नामांकित ई-कॉमर्स कंपन्यांना नोटीस बजावली आहे.

नवी दिल्ली : बनावट वस्तूंची विशेषत: सौंदर्य प्रसाधनांची विक्री केल्याप्रकरणी भारतीय औषध नियंत्रक मंडळाने काही नामांकित ई-कॉमर्स कंपन्यांना नोटीस बजावली आहे. छाप्यांमध्ये देशा-विदेशातील अनेक प्रख्यात कंपन्यांची बोगस सौंदर्य उत्पादने सापडल्यानंतर ही नोटीस बजावण्यात आली आहे.कंपन्यांनी नोटिशीला उत्तर १0 दिवसांत द्यायचे आहे. या ई-कॉमर्स कंपन्यांना या प्रकरणात मोठा दंड ठोठावला जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुळात या ई-कॉमर्स कंपन्या ५0 टक्क्यांहून अधिक सवलतीच्या दरात सौंदर्य प्रसाधने विकत असत. त्यामुळे अनेकांना संशय आला होता. पण आम्हाला उत्पादक कंपन्या अतिशय कमी किमतीत या वस्तू देत असल्याने आम्ही इतकी सवलत देऊ शकतो, असे ई-कॉमर्स कंपन्यांचे म्हणणे होते.सौंदर्य प्रसाधने बनवणाºया कंपन्या त्यांची उत्पादने ई-कॉमर्स कंपन्यांना ज्या भावात देतात, त्याच भावात आम्हालाही द्यावीत, अशी मागणी सौंदर्य प्रसाधनांची घाऊक व रिटेल विक्री करणाºयांनीही सुरू केली होती. मात्र आम्ही सर्वांना एकाच दरात आमची उत्पादने देतो, ई-कॉमर्स कंपन्यांना आणखी वेगळी किंमत लावत नाही, असे उत्पादक कंपन्यांनी सांगितले.त्यामुळे ई-कॉमर्स कंपन्या बनावट व भेसळयुक्त उत्पादने विकत असल्याच्या शंकेवर शिक्कामोर्तबच झाले. दरम्यानच्या काळात उत्तर प्रदेशसह अनेक ठिकाणी या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात छापे मारण्यात आले. त्यात झोपड्यांमध्ये वा अगदी लहान जागेत लिपस्टिक, विविध प्रकारची क्रीम, बेबी आॅइल अशी अनेक उत्पादने बनवली जात असल्याचे आढळून आली. सुमारे ५0 प्रकारची बोगस सौंदर्य प्रसाधने अशा ठिकाणी तयार होत असल्याचे स्पष्ट झाल्यावर ती बनवणाºयांची चौकशी करण्यात आली.>दंड व कारावासाची तरतूदत्यातूनच ही उत्पादने बड्या ई-कॉमर्स कंपन्यांकडे जात आणि ते ती अतिशय कमी भावात ग्राहकांना विकत असत, असे दिसून आले. त्यामुळे या कंपन्यांना नोटीस बजावण्यात आल्याचे सांगण्यात आले. बनावट व भेसळयुक्त उत्पादने विकल्यास दंड व कारावास अशा शिक्षची कायद्यात तरतूद आहे. संबंधित ई-कॉमर्स कंपन्यांनी मात्र आपण बनावट वा भेसळयुक्त उत्पादने विकलेली नाहीत, विकत नाही, असा दावा केला आहे.