Join us

करदात्यांना आता नोटिसांचे ई-मेल!

By admin | Published: September 20, 2015 11:32 PM

ई-मेलद्वारे नोटीस पाठविण्याची नवीन व्यवस्था सुरू करण्याचा निर्णय आयकर विभागाने घेतला आहे. करदात्यांसाठी हा मोठाच दिलासा देणारी बाब आहे.

नवी दिल्ली : ई-मेलद्वारे नोटीस पाठविण्याची नवीन व्यवस्था सुरू करण्याचा निर्णय आयकर विभागाने घेतला आहे. करदात्यांसाठी हा मोठाच दिलासा देणारी बाब आहे.आयकर विभागाच्या या निर्णयाने करदाते आणि कर अधिकारी यांना आमनेसामने येण्याची गरज पडणार नाही. आयकर विभागाचे अधिकारी नेहमी छळ करतात, अशा तक्रारी यापूर्वी अनेक करदात्यांनी केल्या होत्या. आता ई-मेलद्वारे नोटीस पाठविण्याच्या निर्णयाने करदात्यांची अशा प्रकरणातून सुटका होणार आहे. याबाबत आवश्यक ती तांत्रिक क्षमता प्राप्त करण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) काम करीत आहे.सीबीडीटीच्या अध्यक्षा अनिता कपूर यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत ही माहिती दिली. त्या म्हणाल्या की, करदात्यांचे जीवन कशा रीतीने सुसह्य होईल, या दृष्टीने आम्ही विचार करीत आहोत. त्यातही मध्यम आणि थोडे उच्च श्रेणीत येणाऱ्यांसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. एखाद्या प्रकरणात किंवा तपासात नोटीस जारी झाल्यास करदाता विभागाला इलेक्ट्रॉनिक माध्यमातूनच उत्तर पाठविले जाऊ शकते. या प्रक्रियेने सुरक्षाविषयक प्रश्न निर्माण होतात का? याचा अभ्यास सुरू आहे. त्यानंतर ही प्रक्रिया कार्यान्वित केली जाऊ शकते.