नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेची (पीएनबी) १४ हजार कोटी रुपयांची कर्जे घेऊन देशातून पळून गेलेल्या हिरे व्यापारी नीरव मोदीविरुद्ध विशेष न्यायालयाने २५ सप्टेंबरपर्यंत कोर्टापुढे हजर न झाल्यास स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्याची जाहीर नोटीस काढली आहे. त्यात भारत, ब्रिटन व संयुक्त अरब अमिरातीमधील मालमत्तांचाही समावेश आहे.फरार आर्थिक गुन्हेगारांच्या मालमत्ता जप्त करण्यासंबंधीच्या नव्या वटहुकुमानुसार ईडीने मोदीच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी अर्ज केला आहे. त्यात मोदीने बँकेचे कर्ज अन्यत्र वळवून उभ्या केलेल्या ३,५०० कोटी रुपयांच्या मालमत्तांचा तपशील आहे.‘ईडी’च्या अर्जावर न्यायालयाने मोदीला २५ जुलै रोजी समन्स काढले होते. तरीही हजर न झाल्याने विशेष न्यायालयाचे न्या. एम. एस. आझमी यांच्या स्वाक्षरीने ही नोटीस प्रसिद्ध झाली. खटल्याला सामोरे न जाता तुम्ही देशाबाहेर निघून गेल्याने तुम्हाला ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ घोषित करून ‘ईडी’ने त्यांच्या अर्जात नमूद केलेल्या तुमच्या मालमत्ता जप्त का करू नयेत, याचे उत्तर देण्यासाठी हजर होण्याची ताकीद त्यात मोदीला दिली आहे. न आल्यास कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असेही नोटिशीत म्हटले आहे. मोदीची बहीण पूर्वी व भाऊ निश्चल यांच्या नावेही न्यायालयाने नोटिसा प्रसिद्ध केल्या आहेत.
नीरव मोदी, भावंडांविरुद्ध मालमत्ता जप्तीची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 3:57 AM