मुंबई : घातक मात्रेत प्रदूषण करण्यामुळे व ते लपविण्याच्या प्रकरणात अडचणीत आलेल्या फोक्सवॅगन कंपनीला आणखी दणका बसण्याची चिन्हे आहेत. कंपनीच्या भारतीय रस्त्यांवर धावणाऱ्या गाड्यांमध्येही उत्सर्जनाची मात्रा विहित मर्यादेपेक्षा अधिक आढळल्याने केंद्र सरकारतर्फे कंपनीला नोटिस जारी करण्यात आली आहे. जेट्टा, आॅडी -४ आणि व्हेन्टो अशा मॉडेलमध्ये प्रदूषणाची मात्रा अधिक असल्याचे तपासणीत दिसून आले आल्याचे वृत्त आहे. केंद्रीय अवजड उद्योगाचे अतिरिक्त सचिव अम्बुज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एआरएआयने केलेल्या कंपनीच्या रस्त्यांवरील वाहनांत तपासणीत प्रयोगशाळा तपासणीच्या तुलनेत लक्षणीय तफावत आढळून आल्यामुळे कंपनीला नोटिस जारी करण्यात येत आहे. या नोटिशीद्वारे कंपनीकडे आम्ही तांत्रिक तपशील व त्यावरील त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. जर ही तपासणी पूर्ण झाल्यावर कंपनीच्या भारतातील गाड्यांतूनही ग्राहकांची फसवणूक झाल्याचे आढळले तर कंपनीच्या गाड्या माघारी बोलावण्याचे आदेश देतानाच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत शर्मा यांनी दिले. दरम्यान, या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करताना कंपनीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे असे कळविले आहे की, केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या उच्चाधिकाऱ्यांसोबत कंपनीच्या अधिकाऱ्यांची २९ आॅक्टोबर रोजी बैठक झाली. या बैठकीत, कंपनीच्या डिझेल इंजिनच्या गाड्यातून होणाऱ्या उत्सर्जनाचा अहवाल नोव्हेंबरअखेरीपर्यंत कंपनीतर्फे सरकारला सादर केला जाईल. तसेच, सरकारकडून आलेली नोटिस प्राप्त झाली असून या नोटिशीला ३० नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)सामान्य वाहनातून होणऱ्या उत्सर्जनाच्या तुलनेत ४० पट अधिक प्रमाणात प्रदूषण करणारी वाहने निर्माण करून आणि हा प्रकार सॉफ्टवेअरच्या सहाय्याने खुबीने लपविल्याप्रकरणी अमेरिकी पर्यावरण एजन्सीने कंपनीवर फसवणुकीचा ठपका ठेवला होता. यानंतर, अमेरिका आणि युरोपातून मोठ्या प्रमाणावर कंपनीने गाड्या परत बोलावल्या होत्या.
भारतातही फोक्सवॅगनला नोटीस
By admin | Published: November 05, 2015 12:27 AM