हिंडेनबर्गने दिलेल्या धक्क्यातून सावरल्यानंतर अदानी समूह पुन्हा एकदा खरेदीच्या मोडमध्ये आला आहे. अदानी समुहाने आता आणखी एक कंपनी खरेदी करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी समुहाकडून ४१०० कोटींची बोली लावण्यात आली आहे. अदानी पॉवरने लँको अमरकंटक पॉवरच्या लँडर्सना ४१०० कोटी रुपयांचा सुधारिर प्रस्ताव दिला आहे. औष्णिक विजनिर्मिती करणारी कंपनी लँको अमरकंटक सध्या आर्थिक अडचणीत आहे.
या कंपनीची खरेदी करण्यासाठी अदानी समुहाने आधी ३६५० कोटी रुपयांची ऑफर दिली होती. मात्र आता सहा महिन्यांच्या आतच अदानी समुहाने दुसरी ऑफर दिली आहे. त्यावरून अदानी समूह ही कंपनी खरेदी करण्यासाठी किती उत्सूक आहे, याचा अंदाज येतो. लँको अमरकंटक कंपनी सध्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली आहे. तसेच या कर्जाची परतफेड करण्यासाठी कंपनी आपली भागीदारी विकण्याच्या तयारीत आहे.
वृत्तामध्ये सांगण्यात आले की, फायनान्शियल कॉर्पोरेशनच्या नेतृत्वाखालील कंसोर्टियमच्या एका योजनेअंतर्गत ९५ टक्के कर्जदात्यांनी मत नोंदवलं होतं. त्यानंतर १०-११ महिन्यांनी ही ऑफर सादर करण्यात आली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने पीएफसीच्या नेतृत्वाखालील कंसोर्टियमच्या ३ हजार ०२० कोटी रुपयांच्या प्रक्रियेला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे अदानी समुहाकडे अजूनही संधी आहे. मात्र कंपनीच्या कर्जामध्ये ४१ टक्के भागीदारी असलेले दोन डेट होल्डर्सही बोली प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत. ही बाब अदानी समुहासाठी आव्हान ठरू शकते.
दरम्यान, अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून येत आहे. मागच्या आठवड्यात अदान पॉवरचा स्टॉक २१.२१ टक्के उसळून व्यवसाय करत होता. त्याशिवाय मागच्या तीन महिन्यांमध्ये स्टॉकने ४४.६० टक्के रिटर्न दिला आहे. फेब्रुवारीमध्ये १३२.४० रुपये प्रति शेअर एवढी त्याची किंमत होती. मात्र त्यानंतर त्याचा किमतीमध्ये प्रचंड तेजी आली आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांचा पैसा दुपटीपेक्षा अधिक झाला आहे. फेब्रुवारीपासून आतापर्यंत या स्टॉकने ३०३ टक्के रिटर्न दिला आहे.