मुंबई : विमान प्रवासासाठी आकारण्यात येणाऱ्या सुरक्षा शुल्कात (एव्हिएशन सिक्युरिटी फी) वाढ करण्याचा निर्णय नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) घेतला आहे. येत्या १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या शुल्कवाढीमुळे विमान तिकिटांचे दर वाढणार आहेत.देशातील विमानतळांवर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून (सीआयएसएफ) सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते. त्यासाठी विमान प्रवाशांकडून शुल्क आकारणी केली जाते. या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय डीजीसीएने घेतला आहे. त्यानुसार देशांतर्गत प्रवाशांकडून २०० रुपये, तर आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडून १२ डॉलर (अंदाजित रक्कम ८८२ रुपये) सुरक्षा शुल्क वसूल केले जाणार आहे.इंधन दरामध्ये सातत्याने होत असलेली वाढ, कोरोनामुळे सुरक्षा साधनांसाठी वाढलेला खर्च, त्याचप्रमाणे वाहतुकीवरील निर्बंधांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या विमान कंपन्यांना दिलासा देण्यासाठी तिकिटांच्या दरात ५ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय नुकताच हवाई वाहतूक मंत्रालयाने घेतला. त्यामुळे आधीच विमान तिकिटांच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यात आता सुरक्षा शुल्कात वाढ केल्यामुळे विमान प्रवास आणखी महागणार आहे. ...यांना सूटदोन वर्षांपेक्षा कमी वयाची बालके, ऑनड्यूटी विमान कर्मचारी, कार्यालयीन कामासाठी प्रवास करणारे हवाई दल कर्मचारी, संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी जाणारे प्रवासी, एकाच तिकिटाद्वारे कनेक्टिंग फ्लाइटने प्रवास करणारे, तांत्रिक कारण वा हवामानातील बदलांमुळे अन्य विमानतळावर दाखल होणाऱ्या प्रवाशांना या शुल्कातून सूट देण्यात येणार आहे.
आता विमान प्रवास आणखी महागणार! सुरक्षा शुल्कात वाढ, उद्यापासून अंमलबजावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 8:41 AM