लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पैशांच्या देवाण-घेवाणीशी संबंधित नियमांत भारतीय रिझर्व्ह बँकेने बदल केला असून, त्यानुसार आता ज्यांना रोख रक्कम हस्तांतरण (कॅश पे-आऊट) केले, त्यांची माहिती बँकांना ठेवावी लागणार आहे. हा नवा नियम १ नोव्हेंबर २०२४ पासून लागू होणार आहे.
यातील ‘रोख हस्तांतरण’चा अर्थ ज्या लाभार्थ्यांंचे बँकेत खाते नाही, त्यांना दिलेले पैसे असा होय. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ‘देशांतर्गत निधी हस्तांतरणा’शी संबंधित ऑक्टोबर २०११च्या आपल्या नियमावलीत सुधारणा केली आहे. निधी हस्तांतरण करणाऱ्या बँकेला लाभार्थ्यांचे नाव आणि पत्त्याची नोंद करावी लागेल. त्यासंबंधीचे दस्तावेज बँकांना जपून ठेवावे लागतील. कार्ड-टू-कार्ड हस्तांतरणाशी संबंधित मार्गदर्शक सूचनांना यातून बाहेर ठेवले आहे.