नवी दिल्ली : बँकेशी संबंधित काम पूर्ण करण्यासाठी आता १ तासाचा अतिरिक्त वेळ ग्राहकांना मिळणार आहे. १८ तारखेपासून बँका सकाळी १० च्या ऐवजी सकाळी ९ वाजल्यापासून उघडण्यास ससुरुवात झाली आहे. आरबीआयने बँका उघडण्याचे तास बदलले आहेत. यामुळे ग्राहकांना त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी १ तास अतिरिक्त मिळेल; मात्र बँका बंद होण्याच्या वेळेत कोणताही बदल झालेला नाही. म्हणजे पूर्वीच्या वेळेत बँका बंद होतील.
परकीय चलन बाजार आणि सरकारी रोख्यांमधील व्यवहार आता बदललेल्या वेळेनुसार होणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेच्या फॉरेक्स डेरिव्हेटिव्ह, रुपयाचे व्याजदर डेरिव्हेटिव्ह, कॉर्पोरेट बाँडमधील रेपो इत्यादी फॉरेन एक्स्चेंज (एफसीआय)/भारतीय रुपया यातील व्यवहार सकाळी १० वाजता ऐवजी ९ वाजता पासून सुरू झाले आहेत.
सर्व बँकांना नियम होणार लागू -कोरोना विषाणूच्या साथीमुळे आरबीआयने बँकिंगचे तास कमी केले होते. बँकेत एकाच दिवसात जास्त लोक नसावेत आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करता येईल, हा त्यामागचा उद्देश होता; मात्र आता हे नियम पुन्हा सामान्य करण्यात आले आहेत. देशात एसबीआयसह ७ सरकारी बँका आहेत. याशिवाय देशात २० हून अधिक खासगी बँका आहेत. नवा नियम या सर्व बँकांना लागू होणार आहे.
कार्डलेस एटीएममधून लवकरच व्यवहाराची सुविधा- आरबीआय लवकरच ग्राहकांना यूपीआय वापरून बँका आणि त्यांच्या एटीएममधून पैसे काढण्याची परवानगी देणार आहे. - कार्डलेस म्हणजेच कार्डलेस व्यवहार वाढविण्यासाठी आरबीआय हे करणार आहे. - यासाठी सर्व बँका त्यांच्या एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा यूपीआयद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहे.
पर्सनल, वाहन, गृह कर्ज महागले -स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) सर्व मुदतीच्या कर्जाच्या व्याजदरात ०.१० टक्क्यांनी वाढ केली आहे. बँक ऑफ बडोदानेही कर्जाच्या व्याजदरात नुकतीच वाढ केली आहे. यामुळे ग्राहकांना आता पर्सनल, वाहन आणि गृह कर्जासाठी अधिक इएमआय द्यावा लागेल.
एसबीआयच्या संकेतस्थळानुसार, ग्राहकांसाठी एका रात्रीपासून ते तीन महिन्यांसाठी कर्ज दर (एमसीएलआर) आता ६.६५ टक्केऐवजी ६.७५ टक्के असेल.
याचवेळी तो सहा महिन्यांसाठी ६.९५% ऐवजी ७.०५% इतका झाला आहे. नवीन दर १५ एप्रिलपासून लागू झाले आहेत. त्यामुळे आता बँक ऑफ बडोदासह एसबीआयचे कर्ज घेणे महाग होणार आहे.