Join us  

आता चीनला लागणार भारताचा कांदा!

By admin | Published: July 07, 2016 1:02 AM

चीनमधील कांद्याचे पीक यंदा ३0 टक्क्यांपेक्षाही अधिक वाया गेल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांद्याच्या मागणीत वाढ झाली आहे. गेल्या ३ महिन्यांपासून जे शेतकरी कांद्याचे

- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
 
चीनमधील कांद्याचे पीक यंदा ३0 टक्क्यांपेक्षाही अधिक वाया गेल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांद्याच्या मागणीत वाढ झाली आहे. गेल्या ३ महिन्यांपासून जे शेतकरी कांद्याचे बाजारातील भाव पडल्यामुळे निराश मन:स्थितीत होते, त्यांना या 
शुभ वर्तमानामुळे मोठाच दिलासा मिळणार आहे. निर्यात वाढल्यास देशी बाजारपेठेतही कांद्याला भावाला अर्थातच तेजी प्राप्त होणार आहे. 
भारतात गेल्या वर्षी कांद्याचे उत्पादन घटले, तेव्हा देशी बाजारपेठेत कांद्याच्या भावाने प्रतिकिलो ८0 रूपयांच्या उच्चांकाची पातळी गाठली होती. या भावावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी तसेच निर्यातीचे प्रमाण रोखण्यासाठी, मोदी सरकारने कांदा निर्यातीचा किमान निर्यात दर ४२५ डॉलर्स प्रति टनावरून ७00 डॉलर्स प्रतिटनापर्यंत वाढवला. परिणामी कांदा निर्यातीचे प्रमाण घटले आणि देशी बाजारपेठेत कांद्याचे भाव खाली उतरू लागले. डिसेंबर महिन्यात कांदा निर्यातदारांच्या मागणीनुसार मोदी सरकारने आपल्या पूर्वीच्या आदेशाला स्थगिती दिली आणि निर्यातीचा किमान दरही खाली आणल्यामुळे कांदा निर्यातीचा आलेख पुन्हा वाढू लागला. 
नॅशनल हॉर्टिकल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (एनएचआरडीएफ) आकडेवारीनुसार एप्रिल २0१५ ते मार्च २0१६ च्या दरम्यान भारतातून २५२९ कोटी रूपयांच्या ११.१७ लाख टन कांद्याची निर्यात झाली. गेल्या आर्थिक वर्षात सरकारी नियंत्रण असतांनाही कांदा निर्यातीत ४ टक्क्यांची वाढ झाली. २६ टक्के अधिक किमतीचा कांदा निर्यात झाला. भारतानंतर चीन कांदा निर्यातीत महत्त्वाचा देश आहे. यंदा वाईट हवामानामुळे चीनमधे कांद्याचे ३0 टक्के पीक वाया गेल्याची माहिती हाती आली आहे. 
 
 
यंदा पीक पोहोचले २०६ लाख टनांवर 
भारतात मार्च-एप्रिल महिन्यात कांद्याचे नवे पीक बाजारात येते. यंदा या हंगामात देशात कांद्याचे उत्पादन १८९ लाख टनांवरून २0६ लाख टनांपर्यंत वाढले आहे. मुबलक प्रमाणात कांदा बाजारात आल्याने गेल्या ३ महिन्यांत देशी घाउक बाजारपेठेत ३ ते ५ रूपये प्रतिकिलो पर्यंत कांद्याच्या भावाने किमतीचा तळ गाठला होता. 
महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील कांदा उत्पादक अक्षरश: वैतागले होते. अशा वेळी कांद्याची निर्यात वाढवणे हाच त्यावर पर्याय आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात १.२ लाख टन कांद्याची निर्यात झाली. यंदाच्या एप्रिलमधे ती १.५ लाख टनांवर पोहोचली.
मे, जून महिन्यात या आकडेवारीत १0 ते २0 हजार टन वाढीपेक्षा अधिक भर पडली नसली तरी एनएचआरडीएफ च्या अंदाजानुसार जुलै व आॅगस्ट महिन्यात कांदा निर्यातीचा आलेख हमखास चढता राहील.