लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : यंदा धान (भात) आणि तूरीच्या लागवडीत मोठी घट झाल्यामुळे यंदा डाळ आणि तांदूळ महाग होण्याची शक्यता आहे. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, १५ जुलैपर्यंत धानची लागवड १७.४ टक्क्यांनी कमी झाली आहे. वास्तविक यंदा रशिया-युक्रेन युद्धामुळे सर्व वस्तूंचे भाव वाढलेले असताना केवळ तांदूळ आणि डाळीचे भाव स्थिर होते. मात्र, आता ही परिस्थिती बदलू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.
या महिन्यात दोन्ही वस्तूंच्या दरात वाढ सुरूही झाली आहे. सार्वकालिक उच्चांकावरून ५२ टक्क्यांची घसरण पाहिलेल्या तुरीच्या दरात २०२२ मध्ये आतापर्यंत ६.५ टक्क्यांची तेजी आली आहे.
सरकारी खरेदी घटली
- दरम्यान, २०२१-२२ मध्ये धानाची सरकारी खरेदी घटली आहे. या वर्षाच्या रबी हंगामात ४४ लाख टन धान खरेदी झाली.
- २०२०-२१ मध्ये हा आकडा ६६ लाख टन आणि २०१९-२० मध्ये ८० लाख टन होता. २०२०-२१ मध्ये एकूण धान खरेदी १३५ लाख टन झाली होती.
- यंदाच्या धान खरेदीत हा आकडा गाठला जाण्याची शक्यता कमी आहे, असे सूत्रांनी सांगितले.
- उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांत तर धानाची लागवड गेल्यावर्षीच्या तुलनेत ३१ टक्क्यांनी घटली आहे.
- तुरीच्या लागवडीतही आतापर्यंत २६ टक्के घट झाली आहे.