Join us

करविषयक समस्यांसाठी आता ‘ई-निवारण’ सेवा

By admin | Published: May 19, 2016 4:49 AM

करदात्यांना भेडसावणाऱ्या करविषयक समस्यांचा निचरा जलदगतीने करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने ‘ई-निवारण’ ही डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित सेवा सुरू केली आहे.

मुंबई : करदात्यांना भेडसावणाऱ्या करविषयक समस्यांचा निचरा जलदगतीने करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने ‘ई-निवारण’ ही डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित सेवा सुरू केली आहे. वैशिष्ट्यपूर्ण अशी ही ‘ई-निवारण’ सेवा असून या सेवेचा करदात्यांना विनासायास लाभ मिळावा याकरिता, प्राप्तिकर विभागाने ‘टॅक्स बिझनेस अ‍ॅप्लिकेशन’ नावाने एक वेगळा विभाग सुरू केला आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी करदात्यांना या वेबसाइटच्या माध्यमातून आपली करविषयक समस्या नोंदविता येईल. यासाठी त्यांना प्रत्यक्ष प्राप्तिकर खात्याच्या विभागीय कार्यालयात जाण्याची गरज नाही. तसेच या सेवेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, करदात्याच्या समस्येच्या स्वरूपानुसार ती प्राप्तिकर खात्याच्या कोणत्या कलमाशी निगडित आहे, याची चाचपणी या वेबसाइटशी संलग्न सॉफ्टवेअर करते आणि त्यानुसार त्या विभागाकडे ती समस्या वर्ग करते. केवळ एवढेच नव्हे तर त्या समस्येचे निराकरण कोणत्या पातळीवर आहे, कधी सुटेल किंवा त्याच्यामध्ये नेमके काय होत आहे, याचे अपडेटही संबंधित तक्रारदारास या सेवेअंतर्गत नियमितपणे कळविले जाणार आहेत. (प्रतिनिधी)