मुंबई : स्टेट बँक आॅफ इंडियाने बँकिंग, वित्त सेवा, आॅनलाइन खरेदी, प्रवासाची तिकिटे, विमा हे सर्व एका क्लिकवर काढता येणारे ‘योनो’ अॅप तयार केले आहे. शुक्रवारी केंद्रीय वित्त मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणा-या या अॅपमुळे संपूर्ण बँक आता मोबाइलवरच उपलब्ध होणार आहे. व्हर्च्युअल बँकिंगची ही नांदी समजली जात आहे.
अॅण्ड्रॉईड, स्मार्ट फोनमधील ‘इंटरनेट आॅफ थिंग्स’ या तंत्रज्ञानाने जग जवळ आणले आहे. यातच विविध मोबाइल व्हॅलेट, यूपीआय, अॅपसोबतच आॅनलाइन विक्री करणा-या कंपन्याही कार्यरत आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठ्या स्टेट बँकेने यात एक पाऊल समोर जात व्हॅलेट, आॅनलाइन खरेदी, यूपीआय अॅप, मोबाइल बँकिंग सर्वांचे एकत्रित असे ‘योनो’ अॅप बाजारात आणले आहे.
‘योनो’मध्ये मोबाइल बँकिंग तर असेलच सोबतच आॅनलाइन खरेदी करणाºया ६० कंपन्यांना आम्ही एकत्रित केले आहे. त्यांची खरेदी याच अॅपद्वारे करता येणार आहे. त्यासाठी ग्राहकांना विविध आॅफर्सदेखील मिळतील. याशिवाय ग्राहक याद्वारे स्टेट बँकेचे डीमॅट खाते, डेबिट-क्रेडिट कार्डवरील व्यवहार व स्टेट बँकेचा जीवन विमादेखील काढू शकतील. पुढच्या टप्प्यात म्युच्युअल फंड व सामान्य विमा व्यवहारसुद्धा खातेदारांना ‘योनो’द्वारे करता येतील, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी गुरुवारी मुंबईत पत्रपरिषदेत दिली.
७२ टक्के डिजिटलपासून दूरच
भारतीय स्टेट बँक या देशातील सर्वांत मोठ्या बँकेचे आज ३५ कोटी खातेदार आहेत. नोटाबंदी व त्यानंतरच्या डिजिटल बँकिंग प्रचाराला एक वर्ष लोटल्यावरही ३५ कोटींपैकी १० कोटी खातेदारच आज डिजिटल बँकिंगशी संलग्न आहेत. ४.३ कोटी ग्राहक इंटरनेट बँकिंग, २.६ कोटी मोबाइल बँकिंग व १.२ कोटी खातेदार बँकेचे व्हॅलेट वापरतात. यामुळेच योनो आणल्यानंतर या श्रेणीत खूप वाव आहे, असे रजनीश कुमार यांचे म्हणणे आहे. तसे असले तरी वार्षिक ४ हजार कोटी रुपये तंत्रज्ञानावर खर्च करणाºया स्टेट बँकेचा डिजिटल बँकिंगमधील वाटा देशात सर्वाधिक ३५ टक्के असल्याचा दावा रजनीश कुमार यांनी या वेळी केला.
>नोक-यांवर टांगती तलवार? : इंटरनेटमुळे बँकिंग क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. अशा प्रकारे एका क्लिकवर बँकेची कामे होत असल्याने भविष्यात बँकेत कर्मचा-यांची निकडच भासणार नाही. तंत्रज्ञानाच्या या सोईमुळे अनेक कर्मचाºयांच्या नोक-यांवर टांगती तलवार निर्माण होण्याची भीतीदेखील आहे.
आता बँकेच्या संपूर्ण सेवा मोबाइलवरच
मुंबई : स्टेट बँक आॅफ इंडियाने बँकिंग, वित्त सेवा, आॅनलाइन खरेदी, प्रवासाची तिकिटे, विमा हे सर्व एका क्लिकवर काढता येणारे ‘योनो’ अॅप तयार केले आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:18 AM2017-11-24T00:18:42+5:302017-11-24T00:20:13+5:30