नवी दिल्ली : देय जीएसटीची गणना करताना थेट स्रोतातून कर कपातीची रक्कम वस्तूच्या मूल्यातून वगळण्यात आल्याने महागड्या कार, आभूषणे खरेदी करणे स्वस्त होतील, असे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने (सीबीआयसी) म्हटले आहे.
प्राप्तिकर अधिनियमातहत १० लाख रुपयांपेक्षा अधिक किमतींचे वाहन, पाच लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीची आभूषणे आणि दोन लाखांपेक्षा अधिक मूल्याचे सोने-चांदी खरेदीवर थेट स्रोतावर कर वसुली (टीसीएस) एक टक्का आकारला जात होता. अन्य वस्तूंच्या खरेदीवरही वेगवेगळ्या दराने थेट स्रोतावर कर वसुली केली जाते. देय वस्तू आणि सेवाकराची (जीएसटी) गणना करताना टीसीएसची रक्कम वस्तूंच्या किमतीतून वेगळी ठेवली जाणार आहे.
यापूर्वी डिसेंबरमध्ये सीबीआयसीने म्हटले होते की, प्राप्तिकर अधिनियमातहत ज्या उत्पादनांवर स्रोतावर कर वसुली लागू होती, त्यावर जीएसटीची गणना करताना टीसीएसच्या रकमेचा समावेश केला जाईल. सर्वसंबंधितांकडून मिळालेल्या आक्षेपावर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने चर्चा करून सीबीआयसीने उपरोक्त निर्णय घेतला. टीसीएस हा वस्तूंवरील कर नाही; वस्तूंच्या विक्रीतून विक्रेत्याला मिळणाऱ्या संभाव्य उत्पन्नावर लागणारे अंतरिम शुल्क आहे, असे सीबीडीटीने स्पष्ट केले.
आता महागड्या कार, आभूषणे होणार स्वस्त
देय जीएसटीची गणना करताना थेट स्रोतातून कर कपातीची रक्कम वस्तूच्या मूल्यातून वगळण्यात आल्याने महागड्या कार, आभूषणे खरेदी करणे स्वस्त होतील
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 02:05 AM2019-03-11T02:05:31+5:302019-03-11T02:06:32+5:30