Facebook Blue Tick : फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपची मूळ कंपनी मेटानंही प्रीमियम व्हेरिफिकेशन सर्व्हिसची घोषणा केली आहे. म्हणजेच आता फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हेरिफाईड अकाऊंट म्हणजेच ब्लू टिकसाठी पैसे द्यावे लागणार आहे. वेबसाठी त्याची किंमत 11.99 डॉलर्स (993 रुपये) आणि iOS साठी 14.99 डॉलर्स (1241 रुपये) निश्चित करण्यात आली आहे.
सध्या प्रीमिअम व्हेरिफिकेशनची सुरुवात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये करण्यात येणार आहे. त्यानंतर अन्य देशामध्ये या सेवेची सुरुवात केली जाणार आहे. मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांचा एक संदेश समोर आला आहे. त्यामध्ये या सेवेसंदर्भातील माहिती देण्यात आलीये.
ट्विटरची यापूर्वीच घोषणा
मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने नुकतीच पेड सबस्क्रिप्शन सेवा ट्विटर ब्लू लाँच केली. भारतातील मोबाइल युझर्सना ब्लू टिक मिळवण्यासाठी आणि प्रीमियम सबस्क्रिप्शन सेवेचे फीचर्स वापरण्यासाठी दरमहा 900 रुपये द्यावे लागतील. त्याच वेळी, कंपनीनं सर्वात कमी किमतीचा प्रीमियम सबस्क्रिप्शन प्लॅन 650 रुपयांचा लाँच केला. हा प्लॅन वेब युझर्ससाठी आहे. कंपनीनं ट्विटर ब्लू गेल्या वर्षीच जारी केला होता. युएस, यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि जपानसह काही देशांमध्ये तो लाँच करण्यात आला होते.
दीर्घकाळापासून चर्चा
फेसबुककडून ब्लू टिकबाबत काही मोठी घोषणा केली जाणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. मार्क झुकरबर्ग यांची टीम मेटा व्हेरिफाईडबद्दल बराच काळ संशोधन करत होती. अनेक मुद्यांवर चर्चाही झाली आणि आता झुकरबर्गने फेसबुकबाबत ही मोठी घोषणा केली आहे. दरम्यान, सरकारी आयडीशिवाय कोणीही त्यांचं अकाऊंट व्हेरिफाईड करू शकणार नाही ही महत्त्वाची बाब आहे.