युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) अॅप जीपेच्या (Gpay) कोट्यवधी युजर्ससाठी एक मोठी अपडेट आहे. आता जीपे पेमेंट युजर्स अॅपच्या माध्यमातून सोन्यावर कर्ज घेऊ शकणार आहेत. गुगलनं गुरुवारी यासंदर्भात एक निवेदन जारी केलं. कंपनीनं नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) मुथूट फायनान्ससोबत एक करार केला आहे, ज्याअंतर्गत Gpay युझर्सना सोन्यावर कर्ज दिले जाईल. याव्यतिरिक्त, कंपनीनं त्यांचं एआय असिस्टंट जेमिनी लाइव्ह हिंदीमध्ये उपलब्ध असेल आणि नंतर आणखी आठ भारतीय भाषांमध्ये त्याचा विस्तार केला जाणार असल्याचं म्हटलं. 'गुगल फॉर इंडिया' कार्यक्रमाच्या दहाव्या एडिशनदरम्यान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही घोषणा केली.
जेमिनी लाइव्ह हिंदीमध्ये उपलब्ध
"जगातील सुमारे ११ टक्के सोनं भारतात आहे. देशातील लोक आता परवडणाऱ्या व्याजदरात आणि वापरण्यास सुलभ पर्यायांसह या क्रेडिट उत्पादनाचा वापर करू शकतात," अशी प्रतिक्रिया गूगल इंडियाच्या मॅनिजिंग डायरेक्टर रोमा दत्ता चौबे यांनी दिली.
गुगलची भारतात २० वर्ष पूर्ण
येत्या आठवड्यात बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, तेलुगू, तमिळ, उर्दू या आणखी आठ भारतीय भाषांसह हिंदीतही जेमिनी लाइव्ह सुरू करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. गुगलला आता भारतात २० वर्षे पूर्ण झाली आहेत.
जेमिनी फ्लॅश लाँच होणार
तसेच येत्या काही दिवसांत भारतात 'जेमिनी फ्लॅश १.५' लाँच करण्याची गुगलची योजना आहे. या अपग्रेडमुळे संस्थांना क्लाऊड आणि एआय सोल्यूशन्स सुरक्षितपणे कार्यान्वित करण्यास सक्षम केलं जाईल, ज्यामुळे त्यांना डेटा स्टोअर करण्यास आणि मशीन लर्निंग प्रक्रिया पूर्णपणे भारतातच करण्यास परवानगी मिळेल.