Join us

ICICI बँकेचा ग्राहकांना झटका! आठवडाभरात दुसऱ्यांदा कर्जदर वाढवला; पाहा, नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2022 3:03 PM

खासगी क्षेत्रात आघाडीवर असलेल्या ICICI बँकेने आठवडाभरात दुसऱ्यांदा कर्जदर वाढवले आहेत.

नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पतधोरण जाहीर करताना रेपो दरात अर्धा टक्क्यांची वाढ केली होती. तसेच अनेक महत्त्वाचे निर्णयही घेतले होते. यानंतर आता खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या ICICI ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. आठवडाभरात दुसऱ्यांदा या बँकेने कर्जदर वाढवले आहेत. आधीच महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना बँकांनीही कर्ज वाढ केल्याचा दुहेरी फटका बसणार असल्याचे सांगितले जात आहे. 

रिझर्व्ह बँकेने केलेल्या व्याजदर वाढीनंतर आता सरकारी आणि खासगी बँकांनी कर्जदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने बाह्य घटकांवर आधारित 'आय-ईबीएलआर' (कर्जदर) ०.५० टक्क्यांनी वाढवला आहे. या व्याजदर वाढीनंतर बँकेचा बाह्य घटकांवरील कर्जदर ८.६० टक्के झाला आहे. 

आठवडाभरात दुसऱ्यांदा बँकेने कर्जदर वाढवले

आयसीआयसीआय बँकेने १ जून २०२२ रोजी एमसीएलआरवर आधारित कर्जाचे सुधारित व्याजदर जाहीर केले होते. आता आठवडाभरात दुसऱ्यांदा बँकेने कर्जदर वाढवल्याने सर्वच प्रकारची कर्जे महागणार आहे. गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जे तसेच व्यावसायिक कर्जांच्या मासिक हप्त्यांमध्ये मोठी वाढ होणार आहे. बाह्य घटकांवरआधारित एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (I-EBLR) ०.५० टक्क्यांनी वाढला असून, तो आता ८.६० टक्के झाला असल्याचे आयसीआयसीआय बँकेने म्हटले आहे. यापूर्वी ५ मे २०२२ रोजी एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट ०.४० टक्क्यांनी वाढवला होता.

दरम्यान, रिझर्व्ह बँकेचा रेपो दर आता ४.९० टक्के झाला आहे. महिनाभरात दुसऱ्यांदा व्याजदर वाढ झाल्याने कर्जदारांना जोरदार झटका दिला आहे. या व्याजदर वाढीने गृह कर्जासह सर्वच प्रकारची कर्जे महागणार आहेत. दुसरीकडे, पतधोरण जाहीर होण्यापूर्वीच कॅनरा बँक आणि HDFC बँकेने कर्जदारांना झटका दिला. एचडीएफसी बँकेने कर्जदर ०.३५ टक्क्यांनी वाढवला आहे. ७ जून २०२२ पासून नवीन कर्जदर लागू झाला आहे. या दरवाढीने कर्जाचा मासिक हप्ता वाढेल. त्याशिवाय गृह कर्ज, वाहन कर्ज तसेच वैयक्तिक कर्ज आणि इतर नवीन कर्ज जादा दराने घ्यावे लागणार आहे. 

टॅग्स :आयसीआयसीआय बँक