नवी दिल्ली - जगभरात क्रिप्टोकरन्सीचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँकेने आखलेल्या योजनेचा अंदाज घेतला तर पुढील वर्षी भारताजवळ आपली स्वत:ची अशी क्रिप्टोकरन्सी असेल. या क्रिप्टोकरन्सीनची काय खास वैशिष्ट्ये असतील हे आपण जाणून घेऊयात.
भारतीय रिझर्व्ह बँक पुढील वर्षी आपली स्वत:ची डिजिटल करन्सी लॉन्च करण्याची शक्यता आहे. त्यासाठी एक योजना आखण्यात आली असून, त्यावर सातत्याने काम सुरू आहे. रॉयटर्सने एका स्थानिक वृत्तपत्राच्या हवाल्याने सांगितले की, भारतीय स्टेट बँकेच्या बँकिंग अँड इकॉनॉमिक्स कॉन्क्लेव्हमध्ये केंद्रीय बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत पूर्ण शक्यता असल्याचे सांगितले.
रिझर्व्ह बँकेच्या पेमेंट आणि सेटलमेंट विभागाचे मुख्य व्यवस्थापक पी. वासुदेवन यांनी बिझनेस स्टँडर्डमध्ये लिहिले की, पुढच्या वर्षातील पहिल्या तिमाहीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल करन्सी आणली जाईल. रिझर्व्ह बँक पुढच्या वर्षी सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDCs) लॉन्च करण्याची शक्यता आहे. ही डिजिटल किंवा व्हर्च्युअल करन्सी असेल. मात्र ही करन्सी भारताचे मूळ चलन असलेल्या रुपयाचे डिजिटल रूप असेल. म्हणजेच ती डिजिटल रुपया असेल.
याआधी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पुढील वर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत CBDCच्या सॉफ्ट लॉन्चची शक्यता वर्तवली होती. मात्र त्यासाठी त्यांनी कुठलीही टाईमलाईन सांगितली नव्हती. तर वासुदेवन यांनी सांगितले होते की, CBDCs लॉन्च करणे एवढे सोपे नाही. तसेच ते लगेच सर्वसामान्यांच्या जीवनाचा भागही होणार नाही. त्यामुळे त्याच्या लॉन्चिंगबाबत कुठलीही घाई नाही आहे. तसेच ही क्रिप्टोकरन्सी लॉन्च करण्यापूर्वी अनेक मुद्द्यांवर विचार सुरू असल्याचे सांगितले.