सर्वसामान्यांवर महागाईचा आणखी एक बोजा वाढणार आहे. खरं तर, विम्याचा प्रीमियम 10 टक्क्यांपर्यंत महाग होऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय कंपन्या आणि मोटार वाहन मालकांसाठी विमा खर्च वाढणार आहे. याचे कारण युक्रेनमधील युद्ध आणि जगभरातील हवामानाशी संबंधित अन्य बाबी आहेत. यामुळे, प्रभावित जागतिक कंपन्यांनी रिइन्शुरन्स दर 40 ते 60 टक्क्यांनी वाढवले आहेत. रिइन्शुरन्स दरात वाढ झाल्यामुळं मालमत्ता, दायित्वं आणि मोटार कव्हरसाठी विमा प्रीमियम येत्या काही महिन्यांत किमान 10 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा असल्याचं देशातील जनरल इन्शुरन्स कंपन्यांच्या अधिकार्यांनी म्हटलंय.
भारताच्या जनरल इन्शुरन्स इंडस्ट्रीत 24 कंपन्या सामील आहेत. या सर्व कंपन्यांची मिळून जनरल इन्शुरन्स इंडस्ट्रीत 84 टक्के बाजारपेठ आहे. भारतीय कंपन्या अनपेक्षित दायित्वे आणि मोठ्या नुकसानीचा प्रभाव कमी करण्यासाठी मोठे विमा संरक्षण खरेदी करतात. ते सहसा आग, सागरी-संबंधित जोखीम, अभियांत्रिकी आणि व्यवसायातील समस्यांपासून संरक्षण करण्यासाठी विमा संरक्षण खरेदी करतात.
मोटार विमा अनिवार्य
देशातील सर्व वाहनधारकांसाठी मोटार विमा अनिवार्य आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये जनरल इन्शुरन्स इंडस्ट्रीजच्या एकूण व्यवसायात एकट्या मोटार विम्यानं सुमारे 81,292 कोटी रुपयांच्या प्रीमियमचं योगदान दिलं आहे. उद्योग तज्ञांच्या मते, रिइन्शुरन्सच्या खर्चात नुकत्याच झालेल्या वाढीमुळे, कार, बाईक आणि व्यावसायिक वाहनांसाठी विमा खरेदीचे प्रीमियम दर पुढील काही महिन्यांत 10-15 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
बँकांनी व्याजदर वाढवले
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाश्चात्य देशांच्या मध्यवर्ती बँकांनी गेल्या 12 महिन्यांत 4.5-5 टक्क्यांपर्यंत व्याजदर वाढवले आहेत. यामुळे जागतिक रिइन्शुरन्स कंपन्यांसाठी भांडवलाची किंमत वाढली आहे. शिवाय, अलिकडच्या वर्षांत हवामान बदलाची अनिश्चितताही वाढली आहे. यामुळे रिइन्शुरन्सधारकांचं मोठं नुकसान झालं आहे. युक्रेन युद्धातील काही घटनांमुळे उद्योगाचं नुकसानही वाढलं आहे.