ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - यूट्युब चॅनेलची संकल्पना गेल्या काही काळात बऱ्यापैकी लोकप्रिय झाली आहे. यूट्युब चॅनेलवर व्हिडीओ टाकून बऱ्यापैकी आर्थिक कमाई करण्याची संधी यामाध्यमातून अनेकांना मिळाली. पण आता मात्र यूट्युबवरून पैसे कमावणे काहीसे अवघड होणार आहे. यूट्युबने जाहीराती देण्याच्या धोरणात बदल केले आहेत. या बदलांनुसार यूट्युब चॅनेलवर जोपर्यंत 10 हजार लाइफाटइम ह्युजचा टप्पा पार होत नाही, तोपर्यंत यूट्यूबवरून आर्थिक कमाई करण्याच्या पार्टनर प्रोग्रॅममध्ये सहभाग होता येणार नाही.
तसेच यूट्युब चॅनेलने जरी 10 हजार ह्युजचा टप्पा पार केल्यानंतरही पैसे मिळणे सोपे राहणार नाही. यूट्यूबने बदललेल्या नियमानुसार अशा यूट्यूब चॅनेलची संपूर्ण चौकशी केली जाईल. त्यानंतरच संबंधित चॅनेलला पैसे द्यायचे की नाहीत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. गेल्या काही काळात चोरलेला, दुसऱ्याची कॉपी केलेला कंटेंट यूट्युबवर टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अशा चोरांना लगाम घालण्यासाठी यूट्युबकडून नवे नियम तयार करण्यात आले आहेत.
यूट्युबच्या प्रॉडक्ट मॅनेजमेंटचे उपाध्यक्ष एरिय बार्डिन यांनी यांनी आपल्या ब्लॉगमधून ही माहिती दिली आहे. या ब्लॉगमध्ये बार्डिन म्हणतात, "आता यूट्युब चॅनेलवर दहा हजार व्ह्यू पूर्ण झाल्यानंतर बदललेल्या धोरणांनुसार संबंधित चॅनेलच्या चित्रफितींचे निरीक्षण केले जाईल. त्या कसोटीत संबंधित चॅनेल पास झाल्यास अशा चॅनेललाच यूट्युब पार्टनर प्रोग्रॅंममध्ये समाविष्ट केले जाईल आणि अशा चॅनेलला जाहीराती दिल्या जातील."