भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीही आता आरोग्य विम्याच्या व्यवसायात उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी यासंदर्भातील माहिती देताना एलआयसी चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत आरोग्य विमा कंपनीतील हिस्सा खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकते, असं म्हटलं. शुक्रवारी, ८ नोव्हेंबर रोजी एलआयसीचा निकाल जाहीर झाल्यानंतर झालेल्या कॉन्फरन्स कॉलमध्ये मोहंती यांनी ही माहिती दिली. या आर्थिक वर्षाच्या अखेरीस, नियामक प्राधिकरणांच्या मंजुरीच्या अधीन राहून स्वतंत्र आरोग्य विमा कंपनीत काही हिस्सा असेल अशी मला आशा आहे, असं ते म्हणाले.
एलआयसी ज्या कंपनीत हिस्सा खरेदी करणार आहे, त्या कंपनीचं नाव सांगणं मात्र मोहंती यांनी टाळलं. दरम्यान, भारत सरकारच्या मालकीच्या कंपनीला आर्थिक वर्ष २०२५ मध्ये स्वतंत्र आरोग्य विमा कंपनी विकत घ्यायची आहे, असं यापूर्वी जून तिमाहीचे निकाल जाहीर करताना मोहंती म्हणाले. एलआयसीने आपल्या विमा उत्पादनांची पुनर्रचना केली आहे आणि ते नियमांचं पूर्णपणे पालन करत आहेत. आम्ही ग्राहक आणि बाजार मध्यस्थांच्या हिताचा समतोल साधला असल्याचंही ते म्हणाले.
निव्वळ नफा घसरला
एलआयसीचा निव्वळ नफा सप्टेंबर तिमाहीत ३.७५ टक्क्यांनी घसरून ७,७२९ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ८,०३०.२८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. तर या कालावधीत कंपनीचा जीएनपीए १.७२% राहिली, जो मागील तिमाहीत १.९५ टक्के होता.
सप्टेंबर तिमाहीत कंपनीचं निव्वळ प्रीमियम उत्पन्न १.५२ लाख कोटी रुपये होतं. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा १.२ लाख कोटी रुपये होता. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत त्यात ११.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या याच कालावधीत हा आकडा १.०७ लाख रुपये होता. जून तिमाहीत कंपनीचं निव्वळ प्रीमियम उत्पन्न १.१४ लाख कोटी रुपये होतं.