Join us

CoronaVirus: दिलदार महिंद्रा! कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना देणार ५ वर्षांचा पगार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 6:52 PM

CoronaVirus: महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना मोठी आर्थिक मदत देण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला आहे.

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. नव्या कोरोनाबाधितांची संख्या काही अंशी घटताना दिसत असली, तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या चिंता वाढवणारी आहे. केंद्र, राज्य सरकार तसेच विविध कंपन्यांकडून अनेकविध उपाययोजना केल्या जात आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा  (Mahindra & Mahindra) कंपनीनेही कर्मचारी तसेच कोरोना रुग्णांसाठी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना मोठी आर्थिक मदत देण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला आहे. (now mahindra will give financial assistance to dependents of its employees who lost lives due to corona)

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना यामुळे मोठा दिलासा मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या कर्मचार्‍यांसाठी मदत जाहीर केली आहे. महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनीश शाह यांनी आपल्या कर्मचार्‍यांना एक पत्र लिहिले असून, यासंदर्भात माहिती दिली आहे. 

गुंतवणुकीची उत्तम संधी; ‘या’ कंपनीचा १,५५० कोटींचा IPO घोषित

शाह यांचे २५ हजार कर्मचाऱ्यांना पत्र

अनीश शाह यांनी महिंद्रा समुहातील सुमारे २५ हजार कर्मचाऱ्यांना हे पत्र लिहिल्याची माहिती मिळाली आहे. महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या कर्मचार्‍यांसाठी फॅमिली सपोर्ट पॉलिसी आणली आहे. यामध्ये कंपनी आपल्या कोणत्याही कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी प्रत्येक मुलाला वर्षाकाठी दोन लाख रुपयांपर्यंतची मदत करणार आहे. तसेच कंपनीने आपल्या कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला त्या कर्मचाऱ्याचं पाच वर्षांचं वेतन आणि वार्षिक उत्पन्नाच्या दुप्पट रक्कम देण्याचे जाहीर केले आहे.

मिशन ऑक्सिजन! आतापर्यंत १३९ रेल्वेतून तब्बल ८,७०० मेट्रिक टन ऑक्सिजन वाहतूक

कुटुंबांवरील ओझे कमी करण्याचा प्रयत्न

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पीडित असलेल्या कुटुंबांवरील ओझे थोडे कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. काही कुटुंबांना आपल्या प्रिय व्यक्तीच्या अचानक निधनाचा सामना करावा लागला आहे. त्याचवेळी घर चालवण्याची अनपेक्षित जबाबदारी स्वीकारावी लागली आहे. अशा वेळी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्या मदतीसाठी आम्ही सज्ज आहोत, असे या पत्रात म्हटले आहे.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहिंद्राकर्मचारीव्यवसाय