राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) केंद्रातील मोदी सरकारच्या वतीने 81.35 कोटी लोकांना मोफत रेशनचा परवठा केला जातो. गेल्या वर्षी सरकारने 31 डिसेंबर 2023 पर्यंत मोफत रेशन मिळत राहील, असे म्हटले होते. मात्र आता या तारखेपूर्वीच बाजारात स्वस्त पीठ उपलब्ध होईल, असे बोलले जात आहे. गहू आणि पिठाच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर सरकार स्वस्त पीठ विकण्यासंदर्भातील योजनेवर काम करत आहे. एका वृत्तानुसार, सरकार भारत ब्रँड अंतर्गत 27.5 रुपये प्रति किलो दराने पीठाची विक्री करेल.
7 नोव्हेंबरपासून सुरू हण्याची शक्यता - या पीठ विक्रीला 7 नोव्हेंबरपासून सुरुवात होणे अपेक्षित आहे. सध्या बाजारात ब्रँडेड पीठाची किंमत जवळपास 35 ते 40 रुपये किलो आहे. तर, एमपीच्या गव्हाच्या पीठाची किंमत जवळपास 45 रुपये किलो एवढी आहे. नॉर्मल ब्रँडच्या पीठाचे 10 किलोचे पॅकेट जवळपास 370 रुपयांना मिळते. या तुलनेत भारत ब्रँडचे पीठ 275 रुपये किलो दराने मिळू शकते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासाठी नॅशनल कंझ्युमर कोऑपरेटिव्ह युनियनला नोडल एजन्सी बनविले जाणार आहे. भारत ब्रँडच्या पीठासाठी FCI सुमारे 2.5 लाख टन गव्हाचे वाटप करेल.
फ्री रेशन योजनेसंदर्भात कसलेही अपडेट नाही - सरकारच्या वतीने चालविण्यात येत असलेली मोफत रेशन योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत चालविली जाणार असल्याचे अधीच जाहीर करण्यात आले आहे. ही योजना पुढे वाढविली जाणार की नाही. यासंदर्भात सरकारकडून अद्याप कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, सरकारकडे गव्हाचा बफर स्टॉक आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही योजना पुढे आणखी वीढविण्यासंदर्भात निर्णय होऊ शकतो. सरकार सहा महिन्यांसाठी अर्थात 30 जूनपर्यंत ही योजना पुढे वाढवू शकते.