- राही भिडे
कोरोना आणि युक्रेन-रशिया युद्धातून जग सावरत नाही, तोच आता जागतिक मंदीचे सावट आले आहे. भारत आणि परदेशात सर्वत्र माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना मंदीचा फटका बसायला लागला असून, या कंपन्यांनी सर्वप्रथम नोकरकपातीलाच सुरुवात केली आहे. कोरोना काळ हा आयटी कंपन्यांसाठी सुवर्णकाळ होता; मात्र कोरोनानंतर हे सोन्याचे दिवस मावळू शकतात, असे सध्याचे वातावरण दिसते. २०२१-२२ च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत भारतातील माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपन्यांची जोमाने होणारी वाढ आता कमी होण्यास सुरुवात झाली. येणाऱ्या काळामध्ये ही परिस्थिती अधिक खराब होण्याची शक्यता आहे, असे जेपी मॉर्गन या संस्थेच्या विश्लेषकांनी म्हटले आहे. ‘नोमुरा’ संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार असे दिसते की, २००० पैकी ७५० जागतिक कंपन्यांच्या आर्थिक वाढीचा वेग येत्या तिमाहीत मंदावू शकतो. टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजीज, विप्रो, टेक महिंद्रा या प्रमुख आयटी कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये १०-१५ टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यांच्या समभागांमध्ये होणारी गुंतवणूक कमी झाल्याचे दिसते आहे.
सर्वाधिक महसूल देणाऱ्या अमेरिकेतील परिस्थितीचा फटकादेखील या आयटी कंपन्यांना बसला आहे. कोरोना काळात इंटरनेटचा भरपूर वापर सुरू झाला. घराच्या बाहेर पडताच येत नसल्याने सर्व सेवा घरपोच मिळणे गरजेचे होते. शिक्षण ऑनलाईन झाले म्हणून बायजूस, अनअकॅडमी यासारखी लर्निंग ॲप्स, झूम, गुगल मीटसारखे टिचिंग आणि मिटिंग ॲप्स, झोमॅटो, स्विगी, डेन्झो यासारखी फूड अँड ग्रोसरी डिलेव्हरी ॲप्स, ऑनलाईन शॉपिंग ॲप्स, वेगवेगळ्या साईट्स अशा सेवांची गरज अचानक वाढली आणि ग्राहकांची वाढती मागणी पुरविण्यासाठी अमेरिकेसह जगभरातील मार्केटमधून सॉफ्टवेअर सेवा तेजीत आल्या. परिणामी, वेगाने नोकर भरती झाली. आता ही परिस्थिती झपाट्याने बदलते आहे. महागाईमुळे व्याजदरात वाढ झाली आहे. मंदीची भीती निर्माण झाल्याने गुंतवणूक मिळणे कठीण झाले आहे, नवीन क्लायंट मिळणे कठीण झाले आहे. नवीन आयटी कंपन्या कर्मचाऱ्यांना चांगले पॅकेज देऊन मोठ्या आयटी कंपन्यांसाठी स्पर्धा निर्माण करीत आहेत, म्हणून प्रोजेक्ट पूर्ण करण्याची क्षमता कमी झाली आहे. कर्मचाऱ्यांना टिकवून धरायचे असेल तर जास्त पगार द्यावा लागेल; मात्र ते कंपन्यांना परवडत नाही. कोरोना काळात ज्याप्रकारे मोठ्ठी पॅकेजेस् मिळत होती, तशी आता मिळण्याची शक्यता कमी असणार आणि पगारवाढही पहिल्यासारखी नसणार. या कारणामुळे कर्मचारी कंपनी सोडण्याचा विचार करीत असतील तर कंपन्यादेखील त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करताना दिसत नाहीत.
गूगल, ॲमेझॉन, ॲपल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, नेटफ्लिक्स आणि टेस्लासह सर्व टेक दिग्गज, मंदीचा सामना करण्यासाठी तयारी करीत आहेत. या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे, नवीन भरतीवरही बंधने आली आहेत. ‘गूगल’ची मूळ कंपनी ‘अल्फाबेट’ने भरती प्रक्रिया मंद गतीने सुरू ठेवली आहे. ‘गूगल’लाही मंदीचा फटका बसणार आहे. ‘ॲपल’ही त्याच वाटेवर आहे. फेसबुकची मूळ कंपनी मेटाने अभियंते भरती करण्याच्या आपल्या योजनांमध्ये किमान ३० टक्के कपात केली आहे. नेटफ्लिक्सने अनेक फेऱ्यांमध्ये टाळेबंदी केली आहे. जूनमध्ये इलॉन मस्कच्या टेस्ला या इलेक्ट्रिक वाहन कंपनीने कॅलिफोर्नियातील सॅन माटेओ येथील सुविधा बंद केल्यानंतर ऑटोपायलट विभागातील कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. हे सत्र सर्वत्र सुरू असून, आयटी कर्मचाऱ्यांसाठी चिंतेचा विषय आहे.
(लेखिका ज्येष्ठ पत्रकार आहेत)