Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘एनपीएस’साठी आता वर्षाला हजार रुपये!

‘एनपीएस’साठी आता वर्षाला हजार रुपये!

तुमचे ‘नॅशनल पेन्शन स्कीम’चे (एनपीएस) खाते सुरू राहण्यासाठी या पुढे त्यात दरवर्षी किमान एक हजार रुपये भरणेही पुरेसे होणार आहे

By admin | Published: August 11, 2016 02:16 AM2016-08-11T02:16:33+5:302016-08-11T02:16:33+5:30

तुमचे ‘नॅशनल पेन्शन स्कीम’चे (एनपीएस) खाते सुरू राहण्यासाठी या पुढे त्यात दरवर्षी किमान एक हजार रुपये भरणेही पुरेसे होणार आहे

Now NPS for thousands of rupees! | ‘एनपीएस’साठी आता वर्षाला हजार रुपये!

‘एनपीएस’साठी आता वर्षाला हजार रुपये!

नवी दिल्ली : तुमचे ‘नॅशनल पेन्शन स्कीम’चे (एनपीएस) खाते सुरू राहण्यासाठी या पुढे त्यात दरवर्षी किमान एक हजार रुपये भरणेही पुरेसे होणार आहे. एनपीएस’चे नियमन करणाऱ्या ‘पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी’ने (पीएफआरडीए) या पेन्शन योजनेत कराव्या लागणाऱ्या किमान भरण्याचे व खात्यात ठेवाव्या लागणाऱ्या किमान शिलकीचे निकष शिथिल करून ते अधिक ग्राहकस्नेही केले आहेत. यामुळे अधिकाधिक लोक या पेन्शन योजनेत सहभागी होतील, अशी आशा आहे.
‘एनपीएस’मध्ये ‘टियर-१’ आणि ‘टियर-२’ अशी दोन खाती असतात. त्यापैकी ‘टियर-१’ खाते हे प्रत्यक्षात पेन्शन फंडाचे खाते असते व ‘टियर-२’ खाते हे एक प्रकारे बचत खाते असते. ‘टियर-१’ खाते सक्रिय राहण्यासाठी त्यात दरवर्षी काही ठरावीक रक्कम भरावीच लागते व त्यातील रक्कम योजनेची मुदत संपेपर्यंत काढता येत नाही. ‘टियर-२’ खात्यात मात्र, खातेदार त्याच्या सोयीनुसार कितीही रक्कम केव्हाही जमा करू शकतो व गरजेनुसार रक्कम काढूही शकतो.
सध्या ‘टियर-१’ खात्यात दरवर्षी किमान सहा हजार रुपये भरणे सक्तीचे होते. ‘पीएफआरडीए’ने आता ही किमान वार्षिक भरण्याची मर्यादा कमी करून एक हजार रुपये केली आहे. म्हणजे तुमचे ‘एनपीएस’ सक्रिय राहण्यासाठी त्यात दरवर्षी एक हजार रुपये भरणेही पुरेसे आहे. पूर्वी ‘टियर-१’ खात्यात वर्षाला किमान सहा हजार रुपये भरले नाहीत, तर ते खाते गोठविले जायचे आणि खातेदार नंतर त्या खात्यात पैसे जमा करू शकत नसे. आता नव्या नियमानुसार वर्षाला किमान एक हजार रुपये भरले नाहीत, तरच ‘टियर-१’ खाते गोठविले जाईल.
तसेच सध्याच्या नियमानुसार ‘टियर-२’ खात्यात वर्षअखेरीस किमान दोन हजार रुपये व वर्षभर किमान २५० रुपये शिल्लक असणे बंधनकारक होते. एवढी किमान शिल्लक न राहिल्यास ‘टियर-२’ खाते गोठविले जायचे. आता ‘टियर-२’ खात्याच्या बाबतीत किमान शिल्लक रक्कम ठेवण्याचे बंधन पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे. ‘पीएफआरडीए’ने असेही कळविले आहे की, या आधी किमान रक्कम न भरल्याने किंवा किमान रक्कम शिल्लक न ठेवल्याने गोठविली गेलेली सर्व खातेदारांची ‘टियर-१’ व ‘टियर-२’ खाती, फक्त एका वेळेची खास बाब म्हणून सक्रिय करण्यात
येणार आहेत. त्यामुळे खाती गोठविल्याने ज्यांना पैसे भरता आले नाहीत, त्यांना आता त्यात पैसे भरता येतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Now NPS for thousands of rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.