बार्सिलोना : मोबाईल कार्ड खरेदी करताना आधार क्रमांकाचा इलेक्ट्रॉनिक केवायसी वैध दस्तावेज मानण्यात यावा, अशी शिफारस भारतीय दूरसंचार नियामक ट्रायने दूरसंचार विभागाकडे केली आहे. सॉलिसिटर जनरल आणि अॅटर्नी जनरल यांचा सल्ला जाणून घेतल्यानंतर ट्रायने सुमारे १५ दिवसांपूर्वी ही शिफारस दूरसंचार विभागाकडे केली आहे. ट्रायचे चेअरमन आर. एस. शर्मा यांनी मोबाईल वर्ल्ड काँग्रेसच्या पार्श्वभूमीवर बार्सिलोना येथे वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. शर्मा यांनी सांगितले की, आम्ही अनेक शिफारशी केल्या आहेत. त्यातच मोबाईल कनेक्शन देताना आधार क्रमांकाची इलेक्ट्रॉनिक केवायसी वैध धरण्यात यावी, या शिफारशीचाही समावेश आहे. केवायसीची पडताळणी डिजिटल म्हणजेच आॅनलाईन झाल्यास अनेक लाभ होतील. कागदाचा वापर त्यामुळे पूर्णत: संपेल. तसेच सुरक्षेसंबंधीच्या चिंताही दूर होतील. सध्याच्या प्रक्रियेत आधार कार्डला केवायसीसाठी वैध धरले जात असले, तरी त्याची आॅनलाईन पडताळणी करण्यास परवानगी नाही. त्यामुळे आधार कार्डाचे झेरॉक्स कंपनीकडे सादर करावे लागते. (वृत्तसंस्था)
मोबाईल कनेक्शनसाठी आता आॅनलाईन केवायसी
By admin | Published: February 24, 2016 2:36 AM