Join us  

देशी वित्तसंस्थांवरच आता मदार; गुंतवणूकदारांचे ३ लाख १० हजार कोटी बुडाले

By प्रसाद गो.जोशी | Published: October 23, 2023 10:36 AM

देशांतर्गत वित्तसंस्थांनी सातत्यपूर्ण खरेदी करून बाजार खाली येण्यापासून रोखण्याचे प्रयत्न केले, तरी ते कमी पडले.

प्रसाद गो. जोशी, परकीय वित्त संस्थांकडून होत असलेली विक्री आणि आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे वाढत असलेले दर यामुळे बाजारावर निराशेचे ढग दाटले असून, त्याचे पडसाद आगामी सप्ताहात उमटू शकतात. गत सप्ताहात बाजारावर विक्रीचे मोठे दडपण आले. पर्यायाने स्मॉल कॅपचा अपवाद वगळता अन्य सर्व महत्त्वाचे निर्देशांक खाली आले. सध्याच्या जागतिक अस्थिरतेमुळे परकीय वित्तसंस्थांकडून होत असलेली मोठ्या प्रमाणावरील विक्री बाजाराला खाली आणत आहे. देशांतर्गत वित्तसंस्थांनी सातत्यपूर्ण खरेदी करून बाजार खाली येण्यापासून रोखण्याचे प्रयत्न केले, तरी ते कमी पडले.

गत सप्ताहाच्या अखेरीस मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ६५,३९७.६२ अंशांवर बंद झाला. त्यामध्ये ८८५.१२ अंशांची घट झाली राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) २०८.४० अंशांनी खाली येऊन १९५४२. ६५ अंशावर बंद झाला. स्मॉल कॅप निर्देशांकात १३.८९ अंशांची वाढ होऊन तो हिरव्या रंगात बंद झाला. आगामी सप्ताहात सुमारे अडीचशे कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. त्यांच्यावर बाजाराचे भवितव्य अवलंबून आहे.

गुंतवणूकदारांना फटका  

गत सप्ताहात भारतीय बाजार घसरल्याने नोंदणीकृत कंपन्यांचे एकत्रित भांडवलमूल्य तीन लाख दहा हजार ९५८.०१ कोटींनी कमी झाले. कागदोपत्री गुंतवणूकदारांचे तीन लाख दहा हजार कोटी रुपये बुडाले आहेत. बाजाराच्या मानसिकतेवर याचा परिणाम होताना दिसून येतो.परकीय वित्तसंस्थांनी जोरदार केली विक्री

अमेरिकेमधील बाँडचे व्याजदर पाच टक्क्यांवर गेले आहेत.  असून, आगामी काळात त्यात वाढीची शक्यता आहे. जगावर युद्धाचे ढग असल्यामुळे परकीय वित्तसंस्थांनी सावध पवित्रा घेत गुंतवणूक काढण्याचे धोरण कायम ठेवले. गुंतवणूक काढून ती अमेरिकेत गुंतवण्यात संस्था गुंतल्या आहेत. परकीय वित्तसंस्थांनी भारतातून २७९९.०८ कोटी रुपये काढले. देशांतर्गत वित्तसंस्थांनी ३५१०.९७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

 

टॅग्स :शेअर बाजार