Join us  

आता पेट्रोल, डिझेलचे दर दररोज बलण्याची शक्यता

By admin | Published: April 07, 2017 5:10 PM

स्वयंचलित वाहने चालवणाऱ्यांना आता दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील चढऊतारांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 7 - स्वयंचलित वाहने चालवणाऱ्यांना आता दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील चढऊतारांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीच्या दर पंधरवड्याला होणाऱ्या समीक्षेऐवजी  आंतराष्ट्रीय बाजारातील पेट्रोलियमच्या किमतीनुसार दररोज दरांमध्ये बदल करण्याचा विचार सरकारी पेट्रोलियम कंपन्या करत आहेत. त्यामुळे आता सरकारकडून पेट्रोलियम पदार्थांच्या दरांची दैनंदिन समीक्षा करण्यास मान्यता मिळाल्यास यापुढे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत यापुढे दररोज काही पैशांनी वाढ वा घट होणार आहे.  
यासंदर्भातील वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने दिले आहे. या वृत्तानुसार  विकसित देशांप्रमाणे भारतातही पेट्रोलियम पदार्थांच्या दरात फेरबदल होण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दररोज होणाऱ्या बदलांमुळे ग्राहक आणि पेट्रोलियम कंपन्या अशा दोघांनाही फायदा होणार आहे. 
या संदर्भात पेट्रोलियम कंपन्यांच्या प्रमुखांनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची    भेट घेतली आहे. या भेटीनंतर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पेट्रोलियम पदार्थांच्या दरांच्या दैनंदिन समीक्षेसाठी गेल्या काही काळापासून चर्चा सुरू आहे. आता भारतात असे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. ज्याद्वारे दरांमध्ये दैनंदिन फेरबदल  करणे शक्य होईल. सध्या भारतातील पेट्रोलियम पदार्थांच्या एकून बाजारापैकी 95 टक्के बाजारपेठ इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या सरकारी कंपन्यांच्या ताब्यात आहे.