नवी दिल्ली : भारतातील आघाडीच्या कंपन्यांच्या मसाल्यामध्ये आरोग्यासाठी घातक अससेले घटक आढळल्याने सिंगापूर, हाँगकाँग तसेच नेपाळसारख्या देशांनी यांच्यावर बंदी घातली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच भारतीय कंपन्यांची औषधेही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. त्रुटी आढळून आल्याने कंपन्यांवर आपली औषधे परत मागवण्याची वेळ आली आहे. यात डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, सन फार्मा आणि अरबिंदो फार्मा या कंपन्यांचा समावेश आहे.
अमेरिकेतील फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन या संस्थेने भारतातून आयात केल्या जाणाऱ्या जेनेरिक औषधांच्या दर्जाबाबत आणि सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. जेनेरिक औषधे म्हणजे ब्रँडेड औषधाच्या सूत्रावर आधारित दुसरे औषध बनवणे जे तुलनेने खूपच स्वस्त असते. भारत जेनेरिक औषधांचा सर्वांत मोठा उत्पादक आणि निर्यातदारही आहे. (वृत्तसंस्था)
सन फार्मा एम्फोटेरिसिन बी लिपोसोमच्या 11,000 पेक्षा जास्त कुपी परत मागवत आहे. हे एक अँटिफंगल औषध आहे. अमेरिकन औषध नियंत्रकांना तपासणीत या इंजेक्शनचा दर्जा चांगला नसल्याचे आढळले आहे.
ऑरोबिंदो फार्मा क्लोराझेपेट डिपोटॅशियम गोळ्यांच्या १३,००० हून अधिक बाटल्या परत मागवत आहे. हे एक तणाव आणि चिंता दूर करणारे औषध आहे. या गोळ्यांवर पिवळे डाग आढळल्याने परत मागवावे लागले आहे.
एफडीसी लिमिटेड कंपनीने टिमोलॉल मॅलेट ऑप्थॅल्मिक सोल्युशनची ३,८०,००० युनिट्स परत मागवली. काचबिंदूच्या आजारात लागणाऱ्या या औषधाच्या कंटेनरमध्ये छेडछाड केल्याचे आढळून आले होते.
डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज झिव्हिगेटर (सॅप्रोप्टेरिन डायहायड्रोक्लोराइड) या औषधाचे सुमारे २० हजार बॉक्स परत मागवत आहेत. फिनिलकेटोन्यूरिया असलेल्या रुग्णांसाठी हे वापरले जाते. त्याला फेफरे येणे, असेही म्हणतात. या आजारावर ही औषधे परिणामकारक नाहीत, असे आढळून आले आहे.
मसाल्यांवर का घातली बंदी?
एमडीएच व एव्हरेस्टच्या मसाल्यांत हानिकारक कीटकनाशक आढळल्याच्या आरोपानंतर नेपाळनेही काही दिवसांपूर्वी यावर बंदी घातली. नियंत्रकांनी यात कर्करोगासाठी कारणीभूत असलेले इथिलीन ऑक्साईड कीटकनाशक यात आढळल्याचा आरोप केला होता.
भारतात परत का पाठवतात?
आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांनुसार औषधांची तीन प्रकारांमध्ये विभागणी केली जाते.
- वर्ग १ : सर्वांत धोकादायक घटक औषधांमध्ये आढळून येतात. याच्या सेवनाने आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवतात. प्रसंगी रुग्णाचा मृत्यूचाही धोका असतो.
- वर्ग २ : या औषधांमुळे आरोग्याच्या तात्पुरत्या समस्या निर्माण होतात. यामुळे रुग्णाला फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते.
- वर्ग ३ : औषधांचे आरोग्यावर किरकोळ साइड इफेक्ट्स आढळल्यास ती परत पाठवली जातात.