चालू आर्थिक वर्षातील निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी, सरकार हिंदुस्तान झिंक लिमिटेड (Hindustan Zinc Ltd) आणि आयटीसीमधील (ITC) आपला वाटा विकण्याचा विचार करत आहे. खरे तर, पवन हंस, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (बीपीसीएल) धोरणात्मक विक्रीस विलंब आणि भारतीय आयुर्विमा महामंडळातील (LIC) हिस्सेदारी कमी केल्यामुळे, सरकारला हिंदुस्तान झिंक लिमिटेड आणि आयटीसीमधील आपला वाटा विकणे भाग पाडत आहे.
हिंदुस्तान झिंक आणि ITC मध्ये किती आहे हिस्सेदारी -हिंदुस्तान झिंक लिमिटेडमध्ये (HZL) केंद्र सरकारची जवळपास 37,000 कोटी रुपयांची, म्हणजेच 29.54% हिस्सेदारी आहे. तर आयटीसीचा 7.91% हिस्सा युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाच्या स्पेसिफाईड अंडरटेकिंगच्या माध्यमाने आहे. याची किंमत साधारणपणे 27,000 कोटी रुपये एवढी आहे. महत्वाचे म्हणजे, शुक्रवारी NSE वर आयटीसीचा शेअर 2.29 टक्क्यांनी घसरून 273.60 रुपयांवर बंद झाला.
सप्टेंबरमध्ये पूर्ण होऊ शकते प्रक्रिया - इकोनॉमिक टाइम्सने दिलेल्या एका वृत्तानुसार, ऑफर फॉर सेल (OFS) आणि निर्गुंतवणूकीची मर्यादा यांसंदर्भात अद्याप तयारी केली जात आहे. सप्टेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी आशा सरकारला आहे.