Join us  

आता म्युच्युअल फंडात गडबड होणार नाही! १ नोव्हेंबरपासून इनसाइडर ट्रेडिंगसाठी कठोर नियम लागू होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 3:41 PM

मार्केट रेग्युलेटरने इनसायडर ट्रेडिंग रोखण्यासाठी नवीन नियम आणण्याच्या तयारीत आहे. १ नोव्हेंबर २०२४ पासून हे नियम लागू होणार आहेत. हे नियम संवेदनशील माहिती असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी असतील.

शेअर मार्केटमध्ये इनसाइडर ट्रेडिंग किंवा फ्रंट रनिंग असले शब्द तुम्ही अनेकवेळा ऐकले असतील. हे शब्द म्युच्युअल फंडमध्ये अनेकदा ऐकायला मिळतात. अनेकदा फंड हाऊसशी संबंधित लोकांवर गोपनीय माहितीचा वापर करून पैसे कमावल्याचा आरोप केला जातो. म्युच्युअल फंड उद्योगातही पारदर्शकता न ठेवल्याचा आरोप आहे. पण, आता असे होणार नाही. यावर आता नवीन नियम आणण्याच्या तयारीत मार्केट रेग्युलेटर आहे. 

म्युच्युअल फंड उद्योगात पारदर्शकता वाढवण्यासाठी बाजार नियामक सेबी कठोर नियम आणत आहे. इनसाइडर ट्रेडिंगला आळा घालण्याची तरतूद आहे.

सेबीचा हा नवीन नियम काही कर्मचाऱ्यांसाठी आहे. ज्या कर्मचाऱ्यांकडे संवेदनशील माहिती आहे त्यांच्यासाठी हा नवीन नियम असणार आहे. म्हणजे एखाद्या कंपनीच्या शेअरच्या किमतीत वाढ किंवा घट होणार याची माहिती असणाऱ्यांसाठी असणार आहे. या सर्वांना गोपनीयतेच्या करारावर स्वाक्षरी करावी लागेल की ते कोणतीही संवेदनशील माहिती शेअर करणार नाहीत.

नामनिर्देशित व्यक्तीच्या व्यवहारांची माहितीही दोन दिवसांत द्यावी लागणार

सेबी ने २६ जुलै रोजी नवीन नियमांबाबत अधिसूचना जारी केली. यानुसार, किंमत संवेदनशील माहिती असणारे यापुढे म्युच्युअल फंड युनिट्सचा व्यापार करू शकणार नाहीत. तसेच, ॲसेट मॅनेजमेंट कंपनीला म्युच्युअल फंड योजनेत विश्वस्त आणि त्यांच्या नातेवाईकांची होल्डिंग किती प्रमाणात आहे हे उघड करावे लागेल. नामनिर्देशित व्यक्तीच्या व्यवहारांची माहितीही दोन दिवसांत द्यावी लागणार आहे.

नवे नियम १ नोव्हेंबर २०२४ पासून लागू होणार आहेत.  या अंतर्गत मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांना वेळोवेळी त्यांच्या अंतर्गत नियंत्रणांचे पुनरावलोकन करावे लागेल. सेबीला हे नियम अनेक दिवसापासून लागू करायचे होते. त्यांनी जुलै २०२२ मध्ये इनसाइडर ट्रेडिंग संदर्भात एक सल्लापत्र देखील जारी केले. पण उद्योगसमूहाच्या विरोधामुळे नवीन नियम लागू करण्यास विलंब झाला.

टॅग्स :व्यवसायशेअर बाजार