Join us

भारत आणि युएई'मध्ये यापुढे डॉलर नाही, रुपयांमध्ये होणार व्यवहार! वार्षिक ८००० अब्ज रुपयांच्या व्यापाराचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 5:12 PM

भारत आणि UAE या दोन्ही देशांनी आपापल्या चलनात व्यावसायिक व्यवहार सुरू करण्याचा करार सुरू आहे.

भारताचा युपीआय जगामध्ये धुमाकूळ घालत आहे. फ्रान्सनंतर आता UAE देखील UPI चे चाहते झाले आहे. भारत आणि यूएईच्या मध्यवर्ती बँकांमध्ये दोन करार झाले आहेत. भारत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांनी आपापल्या चलनात व्यवसाय व्यवहार सुरू करण्याचे मान्य केले आहे. तसेच, भारताच्या युनिफाइड पेमेंट्स सिस्टीमला UAE च्या इन्स्टंट पेमेंट प्लॅटफॉर्मशी जोडण्याचे मान्य झाले आहे. या दोन्ही मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या UAE अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी झालेल्या विस्तृत चर्चेदरम्यान सहमती झाली. बैठकीच्या शेवटी, पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या वर्षी मे महिन्यात सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार लागू झाल्यापासून भारत आणि UAE मधील व्यापार सुमारे २० टक्क्यांनी वाढला आहे.

रिलायन्सने मिळवला सर्वाधिक नफा, तर SBI चे 8,299 कोटी बुडाले, पाहा आकडेवारी

आता दोन्ही देशांच्या रुपया आणि यूएई दिरहाम या दोन्ही चलनांमध्ये व्यावसायिक व्यवहार करता येणार आहेत. या दोन सामंजस्य करारांवर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि UAE सेंट्रल बँकेचे गव्हर्नर खालेद मोहम्मद बलमा यांनी स्वाक्षऱ्या केल्या. निवेदनानुसार, दोन्ही देशांच्या मध्यवर्ती बँका व्यावसायिक व्यवहारात रुपया आणि दिरहमचा वापर वाढवण्यासाठी एक फ्रेमवर्क तयार करतील. यासोबतच ते UPI आणि IPP या दोन्ही देशांच्या पेमेंट सिस्टमला जोडण्यासाठी सहकार्य करतील. याचा फायदा भारतीय रुपया आणि UAE दिरहाम या दोघांना होईल.

भारत आणि UAE मधील ८००० अब्ज रुपयांच्या व्यापाराचे लक्ष्य लवकरच गाठले जाईल,'या करारांमुळे आर्थिक सहकार्य आणखी वाढेल आणि यामुळे आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारही सुलभ होतील. आम्ही प्रथमच द्विपक्षीय व्यापारात ८५ डॉलर अब्जपर्यंत पोहोचलो आहोत. लवकरच आम्ही १०० अब्ज डॉलर्सचे लक्ष्य गाठू. आम्ही दृढनिश्चय केल्यास, आम्ही G20 शिखर परिषदेपूर्वी हे लक्ष्य गाठू शकतो, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि UAE मधील स्थानिक चलनांमध्ये व्यवसाय व्यवहार सुरू करण्याचा करार दोन्ही देशांमधील मजबूत आर्थिक सहकार्य आणि परस्पर विश्वास दर्शवतो. या करारामुळे द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक मजबूत होईल. पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेणे नेहमीच आनंददायी असते. त्यांची ऊर्जा आणि विकासाचा दृष्टीकोन वाखाणण्याजोगा आहे. सांस्कृतिक आणि आर्थिक संबंधांना चालना देण्याच्या मार्गांसह भारत-यूएई संबंधांशी संबंधित सर्व विषयांवर आम्ही चर्चा केली. शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याकडून नेहमीच बंधुप्रेम मिळाल्याचे मोदी म्हणाले.

टॅग्स :नरेंद्र मोदीभारतीय रिझर्व्ह बँक