नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा फैलाव आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणींसा सामना करत असलेल्या कामगार आणि कर्मचारीवर्गाला काहीसा दिलासा देण्याची तयारी सरकारकडून सुरू आहे. नोकरदार वर्गाला नोकरी बदलल्यानंतर आता पीएफप्रमाणेच आता ग्रॅच्युईटीही ट्रान्सफर करता येणार आहे. म्हणजेच तुम्ही एका कंपनीत राजीनामा देऊन नव्या ठिकाणी जॉईन झाल्यास तुम्हाला ग्रॅच्युईटीसाठी जुन्या कंपनीमध्ये खेटे घालावे लागणार नाहीत. ज्याप्रकारे तुमचा पीएफ दुसऱ्या कंपनीत ट्रान्सफर होतो. त्याचप्रमाणे ग्रॅच्युईटीची रक्कमही ट्रान्सफर होणार आहे.
दरम्यान, कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर मदत पॅकेजची घोषणा करताना निर्मला सीतारामन यांनी कामगार कायद्यात काही बदल करण्याचे संकेत दिले होते. यानुसार आता ग्रॅच्युईटी मिळवण्यासाठीचा कालावधी एक वर्षावर आणण्यात येण्याची शक्यता आहे. प्रस्तावित कामगार कायद्यामध्ये ग्रॅच्युईटीसाठी पाच वर्षांच्या कालावधीऐवजी एक वर्षाच्या कालावधीची तरतूद करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे जे कर्मचारी पाच वर्षांपूर्वी नोकरी सोडतात किंवा ज्यांचा रोजगार जातो, त्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे कुठल्याही कर्मचाऱ्याने एक वर्षापर्यंत नोकरी केली तर त्याला नोकरी सोडल्यावर ग्रॅच्युईटी मिळू शकेल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कामगार मंत्रालयाने नोकरी बदलल्यानंतर ग्रॅच्युईटी ट्रान्सफर करण्याच्या प्रस्तावावरही विचार सुरू केला आहे. त्याअंतर्गत पीएफप्रमाणे ग्रॅच्युईटीमध्येही दरमहा कॉन्ट्रिब्युशनच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे. तसेच ग्रॅच्युईटीलाही सीटीसीचा भाग बनवण्याबाबत विचार सुरू आहे.