मुंबई : आजवर केवळ इंटरनेट बँकिंग आणि डेबिट कार्डाच्या माध्यमातून आयकरचा भरणा करण्याच्या पर्यायांमध्ये आता विस्तार करण्याचा निर्णय आयकर विभागाने केला असून, या नव्या पर्यायानुसार यंदाच्या वर्षीपासून क्रेडिट कार्ड आणि यूपीआयच्या माध्यमातून आयकराचा भरणा करता येईल. याकरिता आयकर विभागाने आपल्या वेबसाईटमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे काम सुरू केले आहे.
आयकर विभागाच्या वेबसाईटवर गेल्यानंतर रयुजर नेम व पासवर्ड भरायचा.
आपल्याला ज्या आर्थिक वर्षाचा कर भरणा करायचा आहे, त्याची निवड करायची.
तिथे कर भरणा करण्याच्या टॅबवर क्लिक करायचे.
करभरणा करण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड या पर्यायांसोबतच क्रेडिट कार्ड व यूपीआय हे पर्याय दिसतील.
यांतील आपल्याला हवा तो पर्याय निवडून त्याद्वारे पैसे भरता येतील.
पैशांचा भरणा झाल्यानंतर पुढच्या स्क्रीनवर पैसे भरल्याचे ई-चलन उपलब्ध होईल.
ते ई-चलन डाऊनलोड करून सेव्ह करून ठेवावे.
चालू आर्थिक वर्षांपासून सुविधा उपलब्ध
उपलब्ध माहितीनुसार, नोकरदारांचा आयकर त्यांच्या पगारातून कापला जातो. मात्र, पगाराखेरीज काही अन्य उत्पन्न असेल तर किंवा जे व्यावसायिक आहेत त्यांना आयकराचा भरणा करताना, आयकराचे विवरण भरतेवेळी हा करभरणा करावा लागतो. अशा वेळी संबंधित व्यक्तींच्या निर्धारित उत्पन्नावर जो आयकर लागू आहे, तो त्यांना इंटरनेट बँकिंग तसेच डेबिट कार्डाच्या माध्यमातून करावा लागतो. मात्र, अनेक लोकांकडे नेट बँकिंगची सुविधा नसणे किंवा डेबिट कार्ड नसणे यामुळे करभरणा करताना समस्या उद्भवत होत्या. परिणामी अशा लोकांना धनादेश अथवा डिमांड ड्राफ्टतर्फे करभरणा करावा लागत होता. मात्र, ही प्रक्रिया वेळखाऊ आहे. त्यामुळे यूपीआय (फोन पे, गुगल पे, भारत पे) तसेच क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून निर्धारित कर भरण्याच्या सुविधेचा वापर करता येईल का? याची चाचपणी करण्याचे निर्देश वित्त मंत्रालयाने दिले होते. चालू आर्थिक वर्षापासून करभरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.