Join us  

आता १५ जूनपर्यंत अ‍ॅडव्हान्स टॅक्सचा हप्ता भरणे गरजेचे

By admin | Published: June 13, 2016 6:04 AM

आता सर्वांनाच आयकराचा अ‍ॅडव्हान्स टॅक्स १५ जूनच्या अगोदर भरावा लागेल म्हणे

अर्जुन (काल्पनिक पात्र) : हे कृष्णा, हे काय नवीन, आता सर्वांनाच आयकराचा अ‍ॅडव्हान्स टॅक्स १५ जूनच्या अगोदर भरावा लागेल म्हणे. या अ‍ॅडव्हान्स टॅक्सच्या तरतुदी कोणाला, कशा व कधी लागू होतात?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, बरोबर आहे. यापूर्वी म्हणजेच, आर्थिक वर्ष २0१५-१६ पर्यंत कंपनी करदाता सोडून इतर करदात्यांसाठी अ‍ॅडव्हान्स टॅक्स १५ सप्टेंबर, १५ डिसेंबर व १५ मार्च अशा तीन हप्त्यांमध्ये भरावा लागत होता, परंतु शासनाने वर्ष २0१६-१७ पासून १५ जूनला पहिला व नंतर उरलेले तीन असे एकूण चार हप्ते केले आहे. आता प्रत्येक करदात्याला ४ हप्त्यांमध्ये अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरावा लागेल. जर अ‍ॅडव्हान्सचा हप्ता चुकविला तर व्याजाचा फटका बसेल.अर्जुन : कृष्णा, अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरणे कुणाला गरजेचे आहे?कृष्ण : प्रत्येक करदाता ज्याचा वार्षिक आयकर रु.१0,000/- किंवा जास्त होतो, त्याला हे नियम लागू होतात. वरिष्ठ नागरिक ज्यांचे वय ६0 वर्षांच्या वर आहे व ते व्यापार करत नसतील, तर अ‍ॅडव्हान्स टॅक्सच्या तरतुदी लागू होत नाहीत, तसेच पगारदार व्यक्तीचे टीडीएस पूर्ण उत्पन्नावर कापले जात असल्यास, अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरायला लागत नाही.अर्जुन : वार्षिक उलाढाल २ कोटींपेक्षा कमी असेल व तो ८ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नफा दाखवत असेल, त्यांना अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरावा लागेल का?कृष्ण : यापूर्वी जे व्यापारी ८ टक्के वा त्यापेक्षा जास्त नफा दाखवत होते, अशांना अ‍ॅडव्हान्स टॅक्सच्या तरतुदी लागू नव्हत्या, परंतु वर्ष २0१६-१७ पासून त्यांनाही या तरतुदी लागू आहे, परंतु त्यांना अ‍ॅडव्हान्स टॅक्स एका हप्त्यामध्ये म्हणजेच, १00 टक्के १५ मार्चच्या अगोदर भरावा लागेल.अर्जुन : अ‍ॅडव्हान्स टॅक्स कधी व किती भरावा?कृष्ण : आता वर्ष २0१६-१७ पासून सर्व करदात्यास १५ जूनपूर्वी १५ टक्केचा पहिला हप्ता, १५ सप्टेंबरपूर्वी ४५ टक्केचा दुसरा हप्ता, १५ डिसेंंबर पूर्वी ७५ टक्केचा तिसरा हप्ता आणि शेवटी १५ मार्चच्या पूर्वी १00 टक्के अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरावा लागतो. उदा. रु.१,00,000/- वार्षिक टॅक्स भरावा लागत असल्यास, १५ हजारांचा पहिला, ३0 हजारांचा दुसरा, ३0 हजारांचा तिसरा व २५ हजारांचा शेवटचा हप्ता भरावा लागेल.अर्जुन : पहिला हप्ता भरण्याअगोदर म्हणजेच १५ जूनपूर्वी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे?कृष्ण : अर्जुना, करदात्याने चालू वर्षाचा अंदाजीत नफा काढून, त्या नफ्यावर किती आयकर भरावा लागेल ते काढावे. दुसरी सोपी पद्धत मागील वर्षी भरलेल्या आयकरावर चालू वर्षाची अंदाजीत वाढ गृहीत धरून अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरावा. उदा. ढोबळ मानाने मागील वर्षी रु. १ लाख आयकर भरल्यास, चालू वर्षी व्यापाऱ्याची अंदाजीत वाढ २0 टक्के गृहीत धरल्यास, वर्षाच्या एकूण आयकर रु. १ लाख २0 हजार होईल व यानुसार अ‍ॅडव्हान्स टॅक्सचा भरणा करावा. अर्जुन : अ‍ॅडव्हान्स टॅक्स कमी-जास्त भरला गेला तर काय होईल?कृष्णा : अर्जुना, जसे जास्तीचे सत्कर्म केलेले केव्हाही कामी येते, तसेच जास्तीचा अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरल्यास तो वाया जात नाही. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आपले रिटर्न तपासून जास्तीच्या भरलेल्या टॅक्सचे व्याजासोबत परतफेड करते. करदात्याने कमी कर भरल्यास जास्तीचा व्याज व इन्कम टॅक्स नोटिसांना सामोरे जावे लागते.अर्जुन : अ‍ॅडव्हान्स टॅक्स न भरल्यास काय होईल?कृष्ण : अर्जुना, अ‍ॅडव्हान्स टॅक्स न भरल्यास, प्रतिमहिना १ टक्के दराप्रमाणे व्याज भरावा लागेल, तसेच चौकशीलाही सामोरे जावे लागेल. मोठ्या रकमेचा अ‍ॅडव्हान्स टॅक्स चुकविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. अर्जुन : करदात्याने ‘कर’ संबंधी निर्णय कसे घ्यावे?कृष्ण : अर्जुना, आयकरात मागील वर्षीचा नफा-तोटा पाहून पुढील वर्षाचे निर्णय घ्यावे लागतात. जीवनात जसे वर्तमान काळाची परिस्थिती पाहून भविष्याचे नियोजन करावे लागते, तसेच चालू वर्षीच्या उत्पन्नानुसार अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरावे लागते व भविष्यातील वाढ लक्षात घेऊन अ‍ॅडव्हान्स टॅक्स किती भरावा, हेसुद्धा ठरवावे लागते. दोन पैसे वाचविण्याच्या नादात नफा अ‍ॅडजेस्ट करून कमी ‘कर’ भरण्यात क्षणिक आनंद होतो, परंतु चौकशी झाल्यास या चुकीचे परिणाम भोगावे लागतात. ‘कर’ भरण्यात नियमितता असावी, नसता ‘जसे करावे, तसेच भरावे लागेल’ हे लक्षात असू द्यावे.- सी. ए. उमेश शर्मा