हरीश गुप्ता
नवी दिल्ली : राष्ट्रीय पेन्शन योजनेंतर्गत (एनपीएस) लाभार्थी राज्यांत महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश ३१ मार्च २०२३ पर्यंतच्या आकडेवारीनुसार आघाडीवर आहेत. त्यात महाराष्ट्रात १८.१० लाख, तर उत्तर प्रदेशात १९.४८ लाख लाभार्थी आहेत.
देशभरात एनपीएस अंतर्गत एकूण एक कोटी ७३ लाख लोकांची नोंदणी आहे. यात केंद्र सरकार, राज्य सरकार, विविध उद्योग यांनी सुरू केलेल्या सर्व पेन्शन योजनांचे लाभार्थी, सर्व नागरिक आणि एनपीएस लाईट योजनेंतर्गत नोंदणी केलेले यांचा समावेश आहे.
५ वर्षांत अशी झाली वाढ
लाभार्थ्यांची संख्या मागील पाच वर्षांत वेगाने वाढली आहे. ३१ मार्च २०१९ रोजी एनपीएस लाभार्थ्यांची संख्या १ कोटी २४ लाख इतकी होती, ती वाढून पुढील तीन वर्षांत १ कोटी ५७ लाख झाली.
महाराष्ट्रात एनपीएसच्या लाभार्थ्यांत २०१९ मधील ११.१३ लाखांवरून २०२३ मध्ये १८.१० लाख अशी वाढ झाली. उत्तर प्रदेशात याच काळात लाभार्थी संख्या १२.८० लाखांवरून १९.४८ लाख अशी वाढली. गोव्यात फक्त ६६,३७१ लाभार्थी आहेत.
‘पीएफआरडीए’तर्फे प्रशिक्षण
एनपीएसच्या विद्यमान लाभार्थींच्या प्रशिक्षणासाठी पेन्शन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाने (पीएफआरडीए) एका संस्थेला नियुक्त केले आहे.
जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही योजना पोहोचावी, यासाठी हे प्रशिक्षण व्यक्तिश: किंवा ऑनलाइनही दिले जात आहे. या विषयातील तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्ती प्रशिक्षणात मार्गदर्शन करत आहेत आणि प्रत्येक महिन्यात ते पूर्वनियोजित केलेले असते.