मुंबई - हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी समुहाच्या कंपनी शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळाले. एका अहवालामुळे अदानींच्या संपत्तीत जवळपास ६०-७० टक्के घट झाली. परंतु एका चांगल्या डिलमुळे सर्वकाही बदलले आहे. संकटाच्या काळात अदानी समुहावर अमेरिकन बुटीक इन्वेस्टमेंट फर्म GQG नं मोठा डाव खेळत १५४४६ कोटी रुपये गुंतवणूक केले. त्यानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये जोरदार उसळी मिळाली.
राजीव जैन यांच्या जीक्यूजी कंपनीने अदानी ग्रुपच्या ४ कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती. आता या शेअर्सच्या दरात झालेल्या वाढीमुळे राजीव जैन यांचा फायदा झाला आहे. कठीण काळात अदानी समूहात गुंतवणूक करणाऱ्या राजीव जैन यांनी तीन दिवसांत बंपर नफा कमावला आहे. त्यांच्या कंपनी GQG Partners ने विकत घेतलेल्या शेअर्सचे गुंतवणूक मूल्य ४,२४५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. २ मार्च रोजी, कंपनीने मोठ्या डीलद्वारे अदानी समूहातील १५४४६ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले होते. सोमवारी ही रक्कम वाढून १९६९१ कोटी रुपये झाली. अदानी समूह हिंडेनबर्गच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असून शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे.
कोणत्या किमतीला शेअर्स खरेदी केले?GQG पार्टनर्सने २ मार्च रोजी १४१०.८६ रुपये प्रति शेअर दराने शेअर्स खरेदी केले होते. सोमवारी या कंपनीच्या शेअरने २१३५ रुपयांची पातळी गाठली होती. अदानी पोर्ट्सचे शेअर्स ५९६.२ रुपये प्रति शेअर दराने खरेदी करण्यात आले. सोमवारी तो ७०६ रुपयांवर पोहोचला. GQG पार्टनर्सने अदानी ट्रान्समिशनचे शेअर्स ५०४.६ रुपये प्रति शेअर दराने खरेदी केले होते. सोमवारी शेअरने ७८०.९ रुपयांची पातळी गाठली. GQG पार्टनर्सने अदानी एंटरप्रायझेसने ३.४ टक्के स्टेकसाठी ५४६० कोटी रुपयांना, अदानी पोर्ट्स ४.१ टक्के स्टेकसाठी ५२८२ कोटी रुपयांना, अदानी ट्रान्समिशनने २.५ टक्के स्टेकसाठी १८९८ कोटी रुपयांना आणि अदानी ग्रीन एनर्जीने ३.६२० टक्के स्टेकसाठी खरेदी केले आहे. यासाठी २८०६ कोटींची गुंतवणूक केली आहे.