Join us  

Stock Exchange : देशातील सर्वात मोठ्या स्टॉक एक्सचेंज घोटाळ्यात रामकृष्णन, आनंद सुब्रमण्यम यांना जामीन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 1:51 PM

देशातील सर्वात मोठ्या स्टॉक एक्स्चेंजमधील घोटाळ्याची सीबीआय चौकशी करत आहे. याप्रकरणी २०१८ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज को-लोकेशन घोटाळ्यात चौकशीला सामोरे जाणाऱ्या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांना दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. या प्रकरणातील दुसरे आरोपी आनंद सुब्रमण्यम यांनाही जामीन देण्यात आला आहे. सुब्रमण्यम हे यापूर्वी NSE चे ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर होते आणि व्यवस्थापकीय संचालकपद भूषवलेल्या चित्रा रामकृष्ण यांचे ते सल्लागारही होते.

देशातील सर्वात मोठ्या स्टॉक एक्स्चेंजमधील घोटाळ्याची सीबीआय चौकशी करत आहे. याप्रकरणी २०१८ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. चित्रा रामकृष्ण यांना या वर्षी ६ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. यापूर्वी ट्रायल कोर्टाने त्यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला होता. त्याचवेळी आनंद सुब्रमण्यम यांना २४ फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती.SEBI च्या रिपोर्टमध्ये खुलासेयानंतर, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने NSE मधील कॉर्पोरेट गव्हर्नन्समधील अनेक त्रुटींबाबत एक अहवाल जारी केला आणि ज्या गोष्टी समोर आल्या त्या थक्क करणाऱ्या होत्या. आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचे आरोप रामकृष्ण यांच्यावर करण्यात आले होते. स्टॉक एक्सचेंज आणि एनआरसीच्या बोर्डाच्या परवानगीशिवाय त्यांनी आनंद सुब्रमण्यम यांची नियुक्ती आणि पदोन्नती केल्याचा आरोप आहे. ज्यासाठी सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली होती, त्याच्याशी संबंधित कोणताही अनुभव त्यांना नसल्याचा आरोपही करण्यात आला. रामकृष्ण यांनी सुब्रमण्यम यांच्या पगारातही बेकायदेशीरपणे वाढ केली होती.

'हिमालयात असलेल्या योगी'शी सल्लामसलत करून आणि त्यांच्याच सल्ल्यानुसार त्या निर्णय घेत होत्या असा मोठा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता. SEBI ने एनएसई, रामकृष्ण आणि रवी नारायण यांच्यासह इतर दोन अधिकार्‍यांना वरिष्ठ स्तरावरील भरतीतील त्रुटींबद्दल दंड ठोठावला होता. नारायण १९९४ ते मार्च २०१३ पर्यंत एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते. तर रामकृष्ण एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०१६ पर्यंत एनएसईच्या एमडी आणि सीईओ होत्या.

टॅग्स :शेअर बाजार