Stock Market : भारतीय शेअर बाजारासाठी मंगळवारचा दिवस मंगळ ठरल्याचं पाहायला मिळालं. चांगल्या जागतिक संकेतांमुळे भारतीय बाजारात जोरदार वाढ झाली आहे. या वाढीत सर्वात मोठा वाटा आयटी, ग्राहकोपयोगी वस्तू, फार्मा आणि ऊर्जा स्टॉक्सचा आहे. आजच्या सत्रात मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्येही जोरदार खरेदी दिसून आली. बाजार बंद होताना बीएसई सेन्सेक्स 361 अंकांच्या उसळीसह 81,921 वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 105 अंकांच्या उसळीसह 25,041 वर बंद झाला. आजच्या वाढीमध्ये निफ्टीने पुन्हा 25,000 चा टप्पा ओलांडण्यात यश मिळविले आहे.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3.50 लाख कोटी रुपयांची वाढआजचा दिवस गुंतवणूकदारांना मालामाल करणारा ठरला. भारतीय शेअर बाजारातील जोरदार वाढीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी भर पडली आहे. बीएसईवर लिस्टेड स्टॉक्सचे मार्केट कॅप 463.66 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 460.17 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3.49 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
या शेअर्समध्ये चढउतारबीएसई सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 22 स्टॉक्स वाढीसह बंद झाले तर 8 तोट्यासह बंद झाले. दुसरीकडे 50 निफ्टी शेअर्सपैकी 33 स्टॉक्स वाढीसह बंद झाले तर 17 स्टॉक्स तोट्यासह बंद झाले. वाढत्या स्टॉक्समध्ये एचसीएल टेक २.१५ टक्के, भारती एअरटेल २.१० टक्के, टेक महिंद्रा १.९२ टक्के, एनटीपीसी १.७३ टक्के, पॉवर ग्रिड १.७० टक्के, ॲक्सिस बँक १.४० टक्के, टीसीएस १.२१ टक्के, टायटन १.१९ टक्के, अदानी पोर्ट्स १.१ टक्के वाढीसह बंद झाले. घसरलेल्यांपैकी बजाज फिनसर्व्ह 1.77 टक्क्यांनी, बजाज फायनान्स 1.45, HUL 0.81 आणि महिंद्रा अँड महिंद्रा 0.68 टक्क्यांनी घसरले.
सेक्टोरल अपडेट आजच्या व्यवहारात सर्वात जास्त वाढ आयटी स्टॉक्समध्ये दिसून आली. निफ्टी आयटी इंडेक्स 1.73 टक्क्यांच्या उसळीसह 42,644 वर बंद झाला. याशिवाय फार्मा, एफएमसीजी, मेटल, मीडिया, एनर्जी हेल्थकेअर आणि कंझ्युमर ड्युरेबल्स शेअर्समध्ये वाढ झाली. तर तेल आणि वायू क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली आहे. आजच्या व्यवहारात मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्समध्येही जोरदार खरेदी दिसून आली.