Join us

एनएसई घोटाळा: देशात १२ छापे; शेअर दलालांच्या कार्यालयांचीही सीबीआयने घेतली झडती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 5:51 AM

एनएसईच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण, ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमणियन यांनी हा को-लोकेशन घोटाळा केल्याचा आरोप आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) को-लोकेशन घोटाळा प्रकरणी सीबीआयने मुंबई, गांधीनगर, दिल्ली, नोएडा, गुरुग्राम, कोलकाता आदी शहरांमध्ये शेअर दलालांच्या कार्यालयांसह १२ ठिकाणी शनिवारी छापे मारले. या घोटाळ्याचे आणखी सबळ पुरावे शोधण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. एनएसईच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण, ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमणियन यांनी हा को-लोकेशन घोटाळा केल्याचा आरोप आहे.

या दोघांवर सीबीआयने आरोपपत्रही दाखल केले आहे. २०१० ते २०१५ या कालावधीत शेअर व्यवहार झालेल्या ६७० दिवसांत ओपीजी सिक्युरिटीज या कंपनीने फ्युचर्स ॲन्ड ऑप्शन्स या विभागात सेकंडरी पीओपी सर्व्हरशी स्वत:ला जोडून घेतले होते.  

योगीचे मार्गदर्शन घेतल्याचा दावा

n एनएसईमध्ये असताना आपण हिमालयातील एका महान योगीच्या मार्गदर्शनानुसार सारे निर्णय घेतो, असे चित्रा रामकृष्ण यांनी सांगितले होते. 

n शेअर बाजाराच्या ट्रेडिंग सिस्टिममध्ये लवकर प्रवेश मिळवून फायदा करून घेतल्याचा आरोप दिल्लीतील ओबीसी सिक्युरिटीजचे मालक आणि प्रवर्तक तसेच शेअर दलाल संजय गुप्ता यांच्यावर आहे.

सर्व्हर आर्किटेक्चरचा गैरवापर

ओपीजी सिक्युरिटीजने एनएसईच्या काही अधिकाऱ्यांसह षडयंत्र रचून सर्व्हर आर्किटेक्चरचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. २०१० ते २०१२ या कालावधीत या कंपनीला को-रिलेशन सुविधा वापरण्याची परवानगी मिळाली. त्यामुळे बाजारातील उलाढालींची माहिती आधीच मिळत होती.

अवाजवी नफा कमवला

n एनएसईच्या अधिकाऱ्यांनी काही शेअर दलालांना दिलेले प्राधान्य तसेच चित्रा रामकृष्ण व सुब्रमणियन यांच्या कार्यकाळात या दलालांना मिळालेला अवाजवी नफा याचीही चौकशी सीबीआय करत आहे.

n सीईओ चित्रा रामकृष्ण यांनी आनंद सुब्रमणियन यांना आपले सल्लागार म्हणून नेमले. त्यांना ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर हे पद व वार्षिक ४.२१ कोटी रुपये वेतन देण्यात आले. 

टॅग्स :शेअर बाजारमुंबईव्यवसाय