नवी दिल्ली : चित्रा रामकृष्ण आणि आनंद सुब्रमण्यम यांच्या वादात अडकलेले नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) नव्या बॉसच्या शोधात आहे. NSE कडून एमडी आणि सीईओ (MD&CEO) पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. नवनियुक्त होणारे व्यक्ती सध्याचे एमडी आणि सीईओ विक्रम लिमये यांचा कार्यभार सांभाळतील.
विक्रम लिमये यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ जुलैमध्ये संपत आहे. NSE ने शुक्रवारी दिलेल्या माहितीत असे सांगण्यात आले की, इनिशियल पब्लिक ऑफरिंगचा (IPO) अनुभव असलेल्या अशा उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. दुसरीकडे, NSE लिमये यांचा कार्यकाळ वाढवू शकते, अशीही शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान, चित्रा रामकृष्ण यांनी जुलै 2017 मध्ये NSE सोडल्यानंतर विक्रम लिमये यांची एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विक्रम लिमये यांना त्यावेळी वार्षिक 8 कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले होते. त्यावेळी बीएसईचे एमडी आणि सीईओ आशिष कुमार चौहान 3.26 कोटींवर होते. चित्रा रामकृष्ण यांनी पद सोडले तेव्हा त्यांचे पॅकेज 7.87 कोटी होते.
कधीपर्यंत अर्ज करता येणार?या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 मार्च आहे. लिमये यांना मुदतवाढ मिळण्यासाठी अन्य उमेदवारांशी स्पर्धा करावी लागणार आहे. लिमये हे NSE च्या री-ब्रँडिंगसाठी ओळखले जातात. अशा स्थितीत त्यालाही पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
पात्रता काय असावी?या पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराचा कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा चांगला ट्रॅक रेकॉर्ड असणे आवश्यक आहे. याशिवाय जोखीम व्यवस्थापन आणि अनुपालन व्यवस्थापनातही प्रवीणता आवश्यक आहे. IPO लाँच करण्याचा आणि व्यवस्थापन करण्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.