मेवात - शिक्षण, आरोग्य, रोजगार या मुलभूत सुविधांमध्ये हरियाणातील नूंह जिल्हा राज्यातच नाही तर देशात सर्वात मागासलेला जिल्हा मानला जातो. परंतु आता नूंहच्या युवकांनी जिल्ह्यावर लागलेला हा ठपका दूर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आता नूंह जिल्ह्यातील गुबराडी गावातील २ सख्ख्या भावांनी मधमाशी पालन व्यवसाय करत स्वत:साठी चांगली कमाई केली त्याचसोबत इतरांसाठी आदर्श बनले आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या मदतीनं मधमाशी पालनाचे धडे देत बेरोजगार युवकांची आर्थिक स्थिती सुधारत आहेत. मधमाशी पालनासाठी सरकारकडून ८५ टक्के अनुदानही देण्यात येते. नूंह जिल्हा बागवानी अधिकारी डॉ. दीन मोहम्मद म्हणाले की, सहूद आणि रिझवान हे गुबराडी गावातील हाजर खान यांचे मुले दोघेही सख्खे भाऊ आहेत. दोघेही पदवीधर आहेत. दोघांनी मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात मधमाशी पालनाचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला दोघांनी ५०-५० डब्ब्यात मधमाशी पालन सुरू केले. जे आता ११० डब्बे झाले आहेत.
या व्यवसायात दोन्ही सख्ख्या भावांनी काही महिन्यांत सुमारे दीड लाख रुपयांचे मध व मेण इतर उत्पादनांची विक्री केली आहे. एकूणच, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मधमाशी पालन हे एक उत्तम माध्यम ठरू शकते. जिल्ह्यातील दोन तरुणांनी याची सुरुवात केली आहे. आता आगामी काळात जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण मधमाशीपालनाकडे किती वेगाने पाऊल टाकतात, हे पाहावे लागेल. त्यांच्या या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हा फलोत्पादन विभाग संपूर्ण अनुदान देण्यास तयार आहे.
मधमाशी पालन व्यवसायासाठी ८५ टक्के अनुदान
८५ टक्के अनुदानासोबतच या तरुणांना रामनगर कुरुक्षेत्रात प्रशिक्षणही दिले जाते. प्रशिक्षणादरम्यान, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था पूर्णपणे मोफत आहे आणि त्या शेतकऱ्यांमधील तरुणांना १ रुपये प्रति किलो दराने कच्चा मधही दिला जातो. दीन मोहम्मद यांच्या म्हणण्यानुसार, शेतकरी आणि बेरोजगार तरुण केवळ ५० मधमाश्यांच्या पेट्यांसह मधमाशी पालनाचा अवलंब करून दरवर्षी त्यांचे उत्पन्न २ लाख रुपयांपर्यंत वाढवू शकतात. ५० पेट्यांवर केवळ तरुणांच्या खिशातून २०-२२ हजार रुपये खर्च करावे लागतात, उर्वरित खर्च राज्य सरकार करते.