मुंबई : देशातील प्रमुख आठ शहरांमधील नवीन गृहसंकुलांच्या संख्येत सहा महिन्यात तब्बल १०६ टक्के वाढ झाली आहे. सर्वाधिक नवीन घरे मुंबई महानगर क्षेत्रात (एमएमआर) उभी होत आहेत. रिअल इस्टेटचे मानांकन देणाऱ्या लिआसेस फोरास या कंपनीच्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे.
आठ शहरांमधील बांधकाम व्यावसायिकांनी जानेवारी-जून २०१८ या कालावधित नवीन गृहसंकुलांचे बांधकाम जोमाने सुरू केले. एमएमआर क्षेत्रात मागील सहा महिन्यात सर्वाधिक २७ हजार ७९८ नवीन घरांचे बांधकाम सुरू झाले आहे. त्यापाठोपाठ १८ हजार १९३ घरे चेन्नईत बांधली जात आहेत.
रिअल इस्टेट क्षेत्रात अनेक धोरणात्मक बदल झाले आहेत. जीएसटी व रेरा हे या क्षेत्रात बदल घडविणारे माईल स्टोन्स आहेत. याखेरीज पंतप्रधान आवास योजनेतील अनुदानाची मर्यादा वाढविल्याचे सकारात्मक परिणामही दिसून आले आहेत. यामुळेच रिअल इस्टेट क्षेत्राला पुन्हा एकदा उभारी येत आहे, असे लिआसेस फोरासचे व्यवस्थापकीय संचालक पंकज कपूर यांचे म्हणणे आहे.
घरांच्या विक्रीतही मागील तिमाहीपेक्षा यंदा ८ टक्के वाढ झाली आहे. एप्रिल ते जून २०१८ या तिमाहीत आठ शहरांमध्ये ६९ हजार ८९७ घरांची विक्री झाली. यापैकी २५ टक्के घरे एमएमआर क्षेत्रात विक्री झाले. मुंबई क्षेत्रातील वाढ १५ टक्के आहे. बंगळुरू व हैदराबादमधील घरांच्या विक्रीतही १७ टक्के वाढ झाली आहे. पण राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) व चेन्नई येथील घरांच्या विक्रीत ३ ते ६ टक्के घट झाली.
किमती १ टक्का वाढल्या
प्रमुख आठ शहरांमधील घरांच्या किमतीतही वर्षभरात एक टक्का वाढ झाली आहे. जून २०१८ अखेरीस घरांचा सरासरी दर ६,८१३ रुपये प्रति चौरस फूट झाला. हाच दर मागील जून महिन्यात ६,७६४ रुपये होता. दरवाढीनंतरही प्रथम श्रेणीतील या आठ शहरांमधील घरांची मागणी वाढती असल्याचे सर्वेक्षणात दिसून येत आहे.
परवडणाऱ्या घरांना सर्वाधिक पसंती
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विक्री झालेल्या एकूण घरांपैकी ६० टक्के घरे ५० लाख रुपयांच्या श्रेणीतील आहेत. त्यापैकी ३२ टक्के घरे २५ लाख रुपये अर्थात परवडणाºया घरांच्या श्रेणीतील आहेत.
नवीन गृहसंकुलांच्या संख्येत १०६ टक्के वाढ
मुंबई महानगर क्षेत्र अव्वल; विक्रीत ८ टक्के वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 11:52 PM2018-08-19T23:52:29+5:302018-08-20T06:50:01+5:30